

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. एकनाथ शिंदे याच्या गटात गेलेल्या आमदारांना शिवसेनेचे नेतृत्व मान्य नव्हते. मुख्यमंत्रीपद मिळावे अशी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची इच्छाही नसेल. शिवसेनेचे ३८ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे ही साधी गोष्ट नसल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारलेले नाही. फडणवीसांचा चेहराच सर्वकाही सांगत होता, रा. स्व. संघाच्या संस्कारामुळेच त्यांनी ही जबाबदारी स्विकारली असावी. 'मी पुन्हा येईन,' हे खरे झालेले नाही, अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शिंदेंचा आमदारांवर प्रभाव हीच मोठी गोष्ट आहे. 38 आमदार बाहेर राहतात ही साधी गोष्टी नाही. आमदार बाहेर नेण्याची कुवत शिंदेनी दाखवली. बंडखोरांना तीन महिन्यापूर्वी हिंदुत्व शब्द माहिती नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीवरील आरोप निव्वळ खोटे आहेत.
पवार म्हणाले, 5 वर्षांपूर्वी ईडीचे नावही कुणाला माहिती नव्हते. विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी ईडीचा वापर. आता खेड्यापाड्यातही ईडीचे नाव माहिती झाले आहे. विरोधकांना ईडीची नोटीस पाठवली जाते. अनेक आमदार, लोकप्रतिनिधींना नोटीसा मिळाल्या आहेत. 2004 ते 2020 च्या निडवणुकीबाबत प्राप्तीकरची नोटीस आत्ता आली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीची चौकशीसाठी प्राप्तीकर विभागाचे पत्र आले आहे.
उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनाने राजीनामा दिला. संजय राऊत यांना दोष देणे चुकीचे. राऊतांवर होणारे आरोप पोरकट आहेत. लोकांमधून बहुमत मिळवले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. औरंगाबादचे नामांतर सामंजस्याने झाले. आगामी निवडणुका मविआ म्हणून लढविण्याविषयी अजून काहीही निर्णय झालेला नाही.
भुजबळांनी बंड केले, सेनेला काही झाले नाही. सेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली नाही. शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. आमदारकी 5 वर्षासाठी असते. पक्ष कायम असतो. 1980 साली माझ्या नेतृत्वाखाली 79 आमदार निवडून आले. 67 पैकी केवळ 5 जण माझ्यासोबत राहिले होते. पण निवडणुकीनंतर सगळं चित्र बदलून गेलं.