

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा 'विठ्ठल'च्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी लबाड बोलण्याची सीमा सोडली आहे. 11 वर्षे 'विठ्ठल'चा कारभार त्यांच्याच हाती होता. कारखान्यातील कुठला पैसा कुठे गाडायचा यावर त्यांनी मास्टरकी मिळवली आहे. तीन वर्षांत मिळालेल्या 217 कोटींमध्ये कारखाना कधीच सुरू झाला असता. हे सर्व जिरवण्यासाठी आता लबाड बोलत सुटले आहेत, अशी टीका युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर केली. फुलचिंचोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते. याप्रसंगी गणेश पाटील, अॅड. दीपक पवार, अमरजित पाटील, शंकर गायकवाड, वसंत गायकवाड, पांडुरंग पापरकर, मारुती वाघ, अण्णासाहेब परांडे, नाना पाटील आदींसह फुलचिंचोली येथील प्रतिष्ठित सभासद उपस्थित होते.
युवराज पाटलांनी कर्ज मिळू दिले नाही, साखर व्यापार्यांना दमबाजी केली, असे विविध आरोप भगीरथ भालके प्रचारसभांमधून करत सुटले आहेत. यावर बोलताना युवराज पाटील यांनी सांगितले की, या निवडणुकीत बंद पडलेला कारखाना सुरू कसा करणार, सभासदांची देणी कशी देणार यावर बोलण्याची गरज आहे. परंतु आपला कारभार लपवण्यासाठी भगीरथ भालके लबाड बोलत सुटले आहेत. कै. भारत भालके आमदार झाल्यापासून कारखान्यावर जात-येत नव्हते. तेव्हापासूनच संचालक भगीरथ भालके यांच्या हाती कारभार होता. कारखान्याकडे आलेला पैसा कुठे ठेवायचा आणि कुठे खपवायचा? हे काम त्यांच्याकडेच होते. गेल्या तीन वर्षांत कारखान्यास 216 कोटी रुपये कर्जरूपाने मिळाले. हे पैसे कुठे गेले, हे भगीरथ भालके यांनाच ठाऊक आहे. एवढे पैसे मिळूनही सभासदांची देणी दिली नाहीत. कारखाना सुरू करणे तर दूरची गोष्ट, असेही त्यांनी सांगितले.