विद्यार्थी रिक्षा वाहतूक असुरक्षित व धोकादायक ; आरटीओ | पुढारी

विद्यार्थी रिक्षा वाहतूक असुरक्षित व धोकादायक ; आरटीओ

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  रिक्षामधून विद्यार्थी वाहतूक असुरक्षित व धोकादायक ठरू शकते, हे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांनी व आरटीओनी रिक्षामधून विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई केली. त्या पार्श्‍वभूमीवर आज शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी रिक्षातून विद्यार्थी वाहतूक तुरळक दिसून आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील दोन वर्षांपासून देशभरातील सर्वच शाळा बंद होत्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळा आजपासून (दि. 15) सुरू झाल्या. पण, पहिल्याच दिवशी रिक्षावाले काका मुलांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे पालकांनीच मुलांना शाळेपर्यंत सोडले.

गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थी वाहतूक करत घरोघरी ‘रिक्षावाले काका’ म्हणून ओळखले जात असलेल्या रिक्षाचालकांनी आरटीओ कारवाईच्या भीतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी वाहतूक करण्यास नकार दिला. त्यामुळे पालकांना आपले काम, धंदा सोडून मुलांना शाळेत सोडायला व घ्यायला जावे लागले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा मुलांचा उत्साह पाहण्यासाठी पालकांनी स्वतः खासगी वाहनातून मुलांना शाळेत सोडायला आले होते. शहरातील कित्येक नामांकित शाळांमध्ये स्कूल व्हॅन नसल्यामुळे व शहरातील हद्दवाढ परिसरात स्कूल व्हॅन येत नसल्यामुळे काही माता पालक मुलांना स्वतः रिक्षा करून शाळेत सोडण्यास आल्या. कित्येक पालकांच्या दुचाकीवर तीन, चार मुले एकत्र दिसून आली.

पहिल्याच दिवशी 30 टक्के अनुपस्थिती

प्रशासन व रिक्षाचालक यांच्यातील गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून आला. शहरातील कित्येक शाळांमध्ये स्कूलबस उपलब्ध नाही, तेथे रिक्षा हेच विद्यार्थी वाहतुकीचे एकमेव साधन आहे. अशा सर्व शाळांमध्ये आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सुमारे तीस टक्के विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दिसून आली.

प्रशासनाकडून रिक्षा संघटनेला अथवा रिक्षाचालकांना विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात कसलीच कल्पना न देता थेट कारवाई करण्याचे आदेश प्रशासन देत असून हे अत्यंत चुकीचे आहे.
– सलीम मुल्ला, लाल बावटा रिक्षा संघटना

रिक्षाचालकांवर कारवाई करून अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याचे काम करत असताना सर्वसामान्यांचाही विचार प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.
– आरती पाटील, पालक

Back to top button