सोलापुरात अन्न प्रशासनाने दीड कोटीचा गुटखा जाळला | पुढारी

सोलापुरात अन्न प्रशासनाने दीड कोटीचा गुटखा जाळला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला सुमारे 1 कोटी 31 लाख रुपयाचा गुटखा, सुगंधी सुपारीचा साठा मंगळवारी (दि. 14) जाळून नष्ट केला. अन्न-औषध विभाग व पोलिसांनी 17 ठिकाणी संयुक्त कारवाई करून हा साठा जप्त केला होता, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. तालुका पोलिस ठाण्याचे पर्यवेक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीत तो नष्ट केल्याचे राऊत म्हणाले.

ते म्हणाले, गेल्या मार्च 2021 ते जुन 2022 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात अन्न प्रशासनाच्या वतीने विविध 17 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यामध्ये अवैध मार्गाने गुटखा, पानमसाला तसेच सुंगधी तंबाखु तस्करी चव्हाट्यावर आणली होती. यावेळी हा साठा जप्त करण्यात आला होता. त्याची एकूण किंमत जवळपास 1 कोटी 31 लाख 1 हजार 846 रुपये होती. हा जप्त केलेला साठा मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मे. किर्ती ग्रोटेक, बोरामणी या कपंनीच्या आवारात मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आला.
यावेळी सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे पर्यवेक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्रीमती रेणुका पाटील, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर व श्रीमती नंदिनी हिरेमठ हे उपस्थित होते.

गुटख्या विरोधात कारवाई कायम राहणार

राऊत म्हणाले, गुटखा बंदी असूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरुन विविध प्रकारच्या गुटख्याची तस्करी होत आहे. अनेक ठिकाणी टीपप मिळाल्यानंतर तसेच माहिती मिळल्यानंतर अन्न प्रशासनाच्यावतीने धाडी टाकून ही कारवाई करण्यात येते. ही कारवाई निरंतर चालू राहणार आहे.

Back to top button