सोलापूर : एमआयएमचा निषेध मोर्चा | पुढारी

सोलापूर : एमआयएमचा निषेध मोर्चा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणार्‍या भाजपचे निलंबित प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएमच्या वतीने सोलापुरात शुक्रवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातून समाजबांधव हजारोंच्या संख्येने व्यवहार बंद ठेवून रस्त्यावर उतरले. यावेळी शर्मा व जिंदाल यांच्या प्रतिमांना जोडेमार आंदोलन करण्यात आले. तसेच भाजपला गर्भीत इशाराही देण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केले. या दोन्ही नेत्यांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहेत. याअंतर्गत सोलापुरातही मुस्लिम बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याअंतर्गत शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाजनंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पासपोर्ट कार्यालयाच्या समोरून निघून सिद्धेश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेजवळील पूनम गेटवर येणार होता. पण मुस्लिम समाजातील युवकांची हजारोंची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने या मार्गावरील सर्व दुकाने बंद केली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गावर मोठा बंदोबस्त लावला.

मोर्चात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या बाबतीत इतका रोष होता की प्रत्येकाने आपली चप्पल काढून या दोन्ही प्रवृत्तीच्या पोस्टवर जोडे मारले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात फारूक शाब्दी, तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. दरम्यान, विजापूर वेस, नई जिंदगी, आसरा चौक आदीसह शहरातील अनेक भागात व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

शाब्दी म्हणाले, आम्ही कुठल्याही धर्मावर टीका करत नाही. पण जातीयवादी भाजपच्या नेत्यांकडून नेहमी मुस्लीम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. तसाच प्रकार सवंग लोकप्रियतेसाठी आता नवीन जिंदाल आणि नुपुर शर्मा यांनी केला. या मोर्चातून भाजपला इशारा देतो की त्यांनी स्वतःहून या दोघांवर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा मुस्लिम समाज पुन्हा पेटून उठेल. सरकारनेही या विरोधात सरकारने ठोस पाऊले उचलावीत अन्यथा येणार्‍या काळात मुस्लीम भाजपला धडा शिवल्याशिवाय राहणार नाही. तौफिक शेख म्हणाले, आम्ही कोणाच्या देव-देवतांचा अवमान करीत नाही. मग भाजप राजकीय पोळी भागण्यासाठी मुस्लिम आणि आमच्या देवतांवर अपशब्दाचे हत्यार म्हणून वापरते. हा प्रकार यापुढे खपवून घेणार नाही.

रियाज हुंडेकरी म्हणाले, हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण शाब्दी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षीय जोडे बाहेर ठेवून आलो आहोत. मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा विषय असताना भाजप हे जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम वाद निर्मिती करीत आहे. असे प्रकार करणार्‍यांना धडा शिकविला पाहिजे. यावेळी भाजपच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात रेश्मा मुल्ला, गाझी जहागीरदार, शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी, मौलाना ताहेर बेग, जमियत ए उलमाचे पदाधिकारी सहभागी झाले.

Back to top button