सोलापूर : गॅस कटरने 2 एटीएम फोडली; 50 लाख लंपास

गॅस कटरने 2 एटीएम फोडली; 50 लाख लंपास
गॅस कटरने 2 एटीएम फोडली; 50 लाख लंपास

मोहोळ / टाकळी सिकंदर : पुढारी वृत्तसेवा मोहोळ-विजापूर रस्त्यावरील मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँक व कुरुल येथील बँक ऑफ इंडिया या दोन एटीएम मशिन गॅस कटरच्या साह्याने कट करून एकूण 49 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. मोहोळ शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून 26 लाख 28 हजार 500 रुपये, तर कुरूल (ता. मोहोळ) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून 22 लाख 99 हजार असे सुमारे 49 लाख 27 हजार रुपये चोरून नेले आहेत. मोहोळ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यात एटीएम फोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये मोहोळ- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ शहरात कुरुल रस्त्यानजीक भारतीय स्टेट बँकेचे पेट्रो कंपनीचे एटीएम मशिन आहे. बुधवार, 8 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशिनमध्ये प्रवेश करून समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर हिरव्या रंगाचा कलर मारून कॅमेरा बंद केला. तसेच सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कट करून एटीएम मशीनमधील 500 रुपयांच्या 4 हजार 872 नोटा, 100 रुपयांच्या 1925 नोटा, अशी एकूण 26 लाख 28 हजार 500 रुपयांची रोख रक्कम व मशिनची सुमारे एक लाख 50 हजार रुपयांची तोडफोड, असे एकूण 27 लाख 77 हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबतची फिर्याद हिताची पेमेंट कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असणारे किरण संजय लांडगे (वय 30, रा. सैनिकनगर, सोलापूर) यांनी दिली.

अज्ञात चोरट्याच्या विरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत. दुसरी घटना कुरुल (ता. मोहोळ) येथे घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी कुरुल चौकामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मशीनचा गॅस कटरच्या सहाय्याने पत्रा कट करून आतील 22 लाख 99 हजार रुपयांची रोखड पळवून नेली. ही घटना बुधवार, 8 जून रोजी पहाटे 3 वाजून 22 मिनिटांनी घडली आहे. याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुल चौकात बँक ऑफ इंडिया शाखेचे इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीन आहे.

दरम्यान, 8 जून रोजी पहाटे 3 वाजून 22 मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरर्‍यावर कलर स्प्रे मारुन कॅमेरा अदृश्य केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिनचा पत्रा कट करून आतील 22 लाख 99 हजार रुपयांची रोकड पळवून नेली. याबाबत कंपनीचे रिजनल मॅनेजर अमोल पवार (रा. बाळे) यांच्या फिर्यादीवरून कामती पोलिसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असणारी दोन एटीएम फोडली, तर एक एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गेल्या महिनाभरापासून चोरी, घरफोडी, लूटमार, दरोडा आदींसारखे प्रकार मोहोळ व कामती पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सतर्कपणे रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news