सोलापूर : तालुक्याच्या ‘दक्षिण’ भागास मृग नक्षत्राने झोडपले | पुढारी

सोलापूर : तालुक्याच्या ‘दक्षिण’ भागास मृग नक्षत्राने झोडपले

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील दक्षिण भागात बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह मृग नक्षत्राने हजेरी लावली. आहेरवाडी, बंकलगी, औराद, राजूर, संजवाड या भागास पाऊणतास पावसाने झोडपून काढले. यामुळे शेत शिवारात सखल भागात पाणी साचले होते. मात्र, तालुक्यातील अनेक भागांतील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गत दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जोराचा वारा वाहू लागला आणि वार्‍याबरोबरच पावसानेदेखील हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, होटगी, कर्देहळ्ळी या भागांमध्ये रोहिणी नक्षत्राने चांगली हजेरी लावली होती. सध्या शेतकरीबांधव खरिपाच्या तयारीला लागले असून, खरिपाच्या पेरणीसाठी खते-बियाणे यांची सज्जता ठेवली आहे.

सध्या खरिपाच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे शेतकरीबांधव सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांशी भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. मुस्ती, बोरामणी, वळसंग या भागांत अत्यल्प पाऊस झाला आहे. हवामान खात्याकडून यंदा मान्सूनची सुरुवात लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मान्सून सुरू होण्यास पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तविली असल्याने शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

गतवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले होते. यंदा तरी खरिपाचे पीक हाती लागेल का, असा सवाल शेतकरी बांधवांतून उपस्थित केला जातोय. तालुक्यात सर्वच भागांमध्ये मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावल्यास यंदाच्या खरिपाच्या पेरण्या वेळेवर होणार आहेत; अन्यथा पावसाने ओढ दिल्यास खरिपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मंडलनिहाय पाऊस
होटगी 54 मि.मी., विंचूर 50 मि.मी., निंबर्गी 46 मि.मी., मंद्रुप 38 मि.मी., वळसंग 15 मि.मी., मुस्ती 10 मि.मी., बोरामणी 8 मि.मी. 

Back to top button