‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’

‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’

Published on

छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासह महान विभूतींचा महाराष्ट्र आज 62 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जागतिक पातळीवर उच्चांकी कामगिरी करत असलेल्या भारत देशाच्या गौरवशाली वाटचालीत महाराष्ट्र योगदान देऊ लागला. पुरोगामी विचारांचा, महिला सबलीकरणाचा, स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा, बालविकासाची चळवळ वेगाने पुढे नेणारा, न्याय- समता- बंधुता ही शिकवण कृतीतून पाळणारा आपला महाराष्ट्र गतीने पुढे जात आहे.

आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. भारतातील अनेक राज्ये एकसारखी होती. मात्र हळूहळू भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर राज्ये विभागली जावू लागली. तेव्हा मुंबई प्रांतात गुजराती व मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली होती. गुजराती भाषेतील लोकांना स्वत:चे वेगळे राज्य हवे होतेे. मराठी भाषा बोलणार्‍या लोकांसाठी वेगळे राज्य हवे होते. त्यातूनच 1956 साली राज्य पुनर्रचना कायद्याची निर्मिती झाली. या कायद्याद्वारे कन्नड भाषा बोलणार्‍या लोकांना म्हैसूर (आताचे कर्नाटक), मल्ल्याळम भाषा बोलणार्‍यांना केरळ, आणि तमिळ भाषा बोलणार्‍यांना तामिळनाडू अशी राज्ये मिळाली. मात्र, मराठी भाषा बोलणार्‍यांना महाराष्ट्र हे राज्य मिळाले नव्हते. 21 नोव्हेंबर 1956 या दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने नव्या महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मुंबईशिवाय महाराष्ट्र स्वीकारणे कोणत्याही महाराष्ट्रीय माणसाला पटणारे नव्हते. मराठी माणसे कमालीची चिडली होती. छोट्या मोठया सभांमधून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आकाराला जात होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आचार्य प्र.के अत्रे, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासह मातब्बर मंडळी सभांमधून रान पेटवत होती. कामगारांचे विशाल मोर्चे निघत होते. प्रचंड मोठया संघटन शक्तीमुळे फ्लोफाऊंटनसमोरील चौकात मोठा निषेध मोर्चा निघाला. एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून तर दुसर्‍या बाजूने बोरीबंदरकडून मोर्चेकरी त्वेषाने येत होते. पोलिसांनी लाठीचार्ज करून मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र हे राज्य नव्हते. मुंबई हे राज्य होते. या राज्याचे मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचा ते कायम द्वेष करत राहिले. त्यांना मुंबई गुजरातला जोडायची होती किंवा स्वतंत्र तरी ठेवायची होती. मराठी माणसाला मात्र मुंबई महाराष्ट्रात असायला हवी होती. याच देसाईंनी मोर्चादिवशी गोळीबाराचा आदेश दिला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 106 हुतात्मे शहीद झाले. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनांमुळे सरकारने नमते घेतले आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

यशवंतराव चव्हाण हे या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र असाच निर्माण झाला नाही तर 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून व त्यागातून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली याची जाण व भान आपणा सर्वांना असायला हवे. मुळातच महाराष्ट्राला जबरदस्त सामाजिक वारसा आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल पुरोगामित्वाकडून आधुनिकतेकडे सुरू आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रीय व्यक्तीने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्रदिनी महाराष्ट्राला वंदन करताना प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' या वृत्तीने राज्याविषयीचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रीयाला असला पाहिजे. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसासाठी सण म्हणूनच साजरा झाला पाहिजे.

1 मे जसा हा महाराष्ट्र दिन आहे तसाच तो कामगार दिवसही साजरा केला जातो. 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने दुसर्‍या आंतरराष्ट्रीय 1989 च्या पॅरिस परिषदेत केली. याच परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. 1891 च्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरीत्या प्रतिवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. तेव्हापासून सर्वत्र 1 मे हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. कामगार वर्गाविषयीही कृतज्ञता ठेवूया.

जय महाराष्ट्र !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news