आंध्र प्रदेश : जिल्हा नामांतरावरून आंदोलनाला हिंसक वळण; मंत्र्याचे अलिशान घर जाळले | पुढारी

आंध्र प्रदेश : जिल्हा नामांतरावरून आंदोलनाला हिंसक वळण; मंत्र्याचे अलिशान घर जाळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशच्या अमलापुरममध्ये मंगळवारी कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलले जाऊ नये, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, तर राज्याचे परिवहन मंत्री पी. विश्वरूप यांच्या घरात आग लावण्यात आली. या परिसरात मोठा तणाव निर्माण झालेला असून कोनसीमा जिल्हा साधना समितीचे सदस्य क्लाॅक टाॅवर सेंटरवर आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलण्यात येऊ नये, यासाठी कोनसीमा जिल्हा साधना समितीचे सदस्य आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या चारचाकीवर हल्ला केला, तर अमलापुरम येथे दगडफेक केली. त्यामध्ये काही पोलीस आणि काही आंदोलन जखमी झाले. एसपी सुब्बारेडी दगडफेकीपासून वाचले आहेत. काही आंदोलकांनी एक बस पेटवली आणि इतर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी परिवहनमंत्री पी. विश्वारूप यांच्या घराला आग लावली. परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी तातडीने मंत्र्याच्या घरातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. आंदोलनकर्त्यांना अमालपुरम येथील मंत्र्यांच्या कार्यालयावरही हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड केली आणि मंत्र्याची अलिशान चारचाकीदेखील पेटवून दिली.

Back to top button