मनसेचे लोक अभ्यासात कमी; संजय राऊतांचा खोचक टोला | पुढारी

मनसेचे लोक अभ्यासात कमी; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई, पुढारी ऑनलाईन : पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले होते की, “माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली”, असा आरोप केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो अपलोड करण्यात आले. “कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है”, अशी कॅप्शनदेखील दिलेली आहे. या फोटोवरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलेले आहे. परंतु, यावर ब्रिजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण आलेले आहे.

Image

राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं : ब्रिजभूषण सिंह

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, “शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी आणल्या होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. त्यांच्याशी माझे संबंध आहेत. आजही शरद पवार आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी नजर चुकवणार नाही. मी त्यांना नमस्कार करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं”, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

मनसेचे लोक अभ्यासात कच्चे : संजय राऊत 

“ब्रिजभूषण सिंह हे आमचे संसदेतील सहकारी आहेत. आम्ही एकत्र बसतो, त्यांना कोण ओळखत नाही. ते खासदार आहेत, आम्ही एकत्र जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं. अभ्यास करा म्हणावं त्यांना अभ्यास. संसदेत लोकं कशाप्रमाणे एकत्र बसतात. सभागृहात बसतात, एकत्र चहापान करतात. आम्ही योगींसोबतही चहापान करतो, म्हणजे योगींना आम्ही रसद पुरवली का? अभ्यासात हे लोक कच्चे आहेत”, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला.

दादरचा काडी पैलवान; राष्ट्रवादीकडून टीका

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र बसल्याचे या फोटोत दिसत आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीकडूनही तेल लावलेल्या पैलवानासोबत दादरचा काडी पैलवान… असे म्हणत संदीप देशपांडे यांचा शरद पवारांसमवेतचा फोटो शेअर सोशल मीडियातून शेअर करण्यात आला आहे. तर,  काही राष्ट्रवादी समर्थकांनी मनसे नेत्यांच्या ट्विटला उत्तर देतानाही हा फोटो शेअर केला आहे.

पहा व्हिडीओ : वाढत्या गॅस दराला कंटाळून महिलांनी पुन्हा पेटवल्या चुली

Back to top button