धारवाड : साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू, तर १० गंभीर | पुढारी

धारवाड : साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू, तर १० गंभीर

अंकली, पुढारी वृत्तसेवा : लग्नसमारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणाऱ्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १० गंभीर जखमी झालेले आहे. या चारचाकीतून २१ जण प्रवास करत होते. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास धाडवाड तालुक्यातील बाड गावाजवळ घडली.

घटनास्थळी धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि धारवाड जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत धारवाड जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मीकांत यांनी दिलेली माहिती अशी की, निगडी मन्सूर येथील युवकाचा विवाह समारंभ उद्या होणार असून लग्नाच्या पहिल्या दिवशी साखरपुडा झाला होता. रात्री उशिरा साखरपुडा संपवून संबंधित सर्व नातेवाईक बेणकट्टी गावाला परतत असताना बाड गावाजवळ वाहनचालकाचा नियंत्रण सुटून गाडी भरधाव वेगाने रस्त्याकडे असलेल्या झाडावर जोरात आदळली.

या घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये ३ बालकांचा समावेश आहे. वाहनातून एकूण २१ जण नातेवाईक प्रवास करत होते. या घटनेतील १० जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हुबळी येथील किम्स आणि जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनन्या (वय-१४), हरीष (वय-१३), शिल्पा (वय-३४), निलवा (वय-६०), मधुश्री (वय-२०), महेश्वराया (वय-११) आणि शंभुलिंगया (वय-३५) अशी मृतांची नावे आहे. त्यांचे संपूर्ण नावे समजू शकली नाहीत. २ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

Back to top button