रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, ३ मृत्यू, २० जखमी | पुढारी

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, ३ मृत्यू, २० जखमी

रायगड; पुढारी वृत्‍तसेवा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोनसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन असा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. आज (ता.०८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी उद्धव सुर्वे यांनी सांगितले. सदर बसचा अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली.

या विषयी अधिक माहिती अशी की, नालासोपारा येथून ही खासगी बस सुटली होती. तिचा घोणसे घाटात आज सकाळी अपघात झाला. MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. एक बस पुलावरुन 60 ते 70 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काहीजण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या मदतकार्य सुरु आहे.

दरम्यान मृतांची ओळख पटवण्याबाबतचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, जर आपल्या पैकी कोणाचे नातेवाईक गावी निघाले असतील तर त्यांच्याशी संपर्क करा.

Back to top button