

चिपळूण पुढारी वृत्तसेवा :चिपळूण व खेड तालुक्यातील 35 गावांना कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर झाली आहे. राज्याच्या पाणीपुरवठा खात्याकडून 88 कोटींच्या योजनेला मंजुरी देत असल्याची माहिती गुरुवारी (दि.10) विधानसभेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले.
या संदर्भात गुहागरचे आ. भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम हे गेले अनेक दिवस पाठपुरावा करीत होते. कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. याबाबत 2017 मध्ये पुणे येथील एका कंपनीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते.
त्यानुसार 88 कोटींची योजना मंजूर झाली आहे. 35 गावांना त्याचा लाभ मिळणार असून सुरुवातीला 27 गावांचे सर्वेक्षण झाले होते. आता त्यात 8 गावांचा समावेश होणार आहे.
यामध्ये चिपळूण तालुक्यातील कान्हे, पिंपळी खुर्द, चिंचघरी, सती, खेर्डी, कापसाळ, चिपळूण शहर, कामथे बु., मिरजोळी, कोंढे, शिरळ, पेढे, वालोपे, कळंबस्ते, खांदाटपाली, पाली, दळवटणे, नवीन कोळकेवाडी, वालोटी, खडपोली, कालुस्ते करंजीकर मोहल्ला, पिंपळी बु., तिवरे, रिक्टोली, आकले, तिवडी, कादवड, दादर, कळकवणे तसेच खेड तालुक्यातील काडवली, काजवेवाडी, आंबडस, चिरणी, लोटे, धामणदेवी, भेलसई या गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या मुद्यावर आ. भास्कर जाधव यांनी सभागृहात जोरदार चर्चा केली व पाणीपुरवठा मंत्र्यांना हा विषय समजावून सांगितला. आ. शेखर निकम यांनी देखील या मुद्द्यावर शासनाकडे आग्रही मागणी करून चिपळूणचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी केली. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी, आपण सूचविलेल्या नव्या गावांचा या योजनेत समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत खेड व चिपळुणातील 35 गावांना कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी मिळणार आहे.