पन्हाळा तालुक्यात तब्बल 25 गव्यांचा कळप वाघवे-खोतवाडी परिसरात घबराट | पुढारी

पन्हाळा तालुक्यात तब्बल 25 गव्यांचा कळप वाघवे-खोतवाडी परिसरात घबराट

वाघवे ; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील वाघवेच्या डोंगराळ भागात खोतवाडी – चव्हाणवाडी-उदाळवाडी परिसरात गेल्या चार दिवसांपासून एक-दोन नव्हे, तर जवळपास 25 गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गव्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

वाघवे परिसरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गव्यांच्या कळपाने ठाण मांडल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. गव्यांच्या भीतीने शेतकर्‍यांनी शेतात जाणे टाळले आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

काही शेतकरी जीव मुठीत घेऊन शेताकडे जात आहेत. वनविभागाने तातडीने याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.

पन्हाळा तालुक्यातील वाघवेच्या वाड्या-वस्ती परिसरात गव्यांचा वावर वाढला असून मोठे नुकसान होत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत उपाययोजनासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव वनविभागास सादर करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले.

वाघवे परिसरासह डोंगराळ भागात गव्यांचा वावर वाढला आहे. त्याबाबत उपाययोजना राबविण्याबात कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी चर मारण्याचा पर्याय पुढे आला असून ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागितला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती वनरक्षक प्रतिभा पाटील यांनी दिली.

Back to top button