पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला उद्या शुक्रवारी (दि.1 मार्च)पासून प्रारंभ होणार आहे. यंदा दहावीचे 16 लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, उद्यापासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेमुळे राज्य मंडळाला अधिक सजग राहावे लागणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांवर मनुष्यबळ कार्यरत राहणार असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने यंदा जोरदार तयारी केली आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळाने गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत दैनंदिन गैरप्रकार वगळता अद्याप तरी मोठा कोणताही गैरप्रकार झाला नसून, परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दहावीच्या परीक्षेला राज्यातील 23 हजार 272 शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 5 हजार 86 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात पुण्यातील तब्बल पावणेतीन लाख विद्यार्थी आणि मुंबईच्या सर्वाधिक साडेतीन लाखांवर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच 8 हजार 810 दिव्यांग विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. दहावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होणार असून, पुढील आठवड्यात गुरुवारी इंग्रजीचा पेपर आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा