SSC and HSC Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परिक्षेत १० मिनिटे जादा वेळ मिळणार

File Photo
File Photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा जादा वेळ वाढवून देण्याचा निर्णय यंदाही कायम ठेवला आहे. दहावी-बारावी परीक्षेला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न घेण्याचा निर्णयावर मंडळ ठाम असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता आणि दुपारच्या पेपरला २.३० वाजता पोहचावे लागेल. परीक्षेस उशीराने म्हणजेच साडेदहानंतर आणि २.३० नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. परीक्षांच्या वेळेविषयी राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी पुन्हा सूचना दिल्या आहेत.

दहावी बारावी परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.पंरतु गेल्या काही वर्षात परीक्षा काळात प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. यामुळे प्रश्नपत्रिका १० मिनिटे न देण्याचा निर्णय यावर्षीही मंडळाने कायम ठेवला आहे. गतवर्षी प्रश्नपत्रिका वाचनासाठी मिळणाऱ्या दहा मिनिटांची सूट ही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांचे वाटप सकाळ सत्रात सकाळी ११ वाजता आणि दुपार सत्रात दुपारी ३ वाजता करण्यात येणार असून या वेळेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकेचे वितरण होणार नाही, याची खबरदारी केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांनी घ्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news