

Simhastha Kumbh Mela Nashik 2027 Taked Fund
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद या तीर्थस्थळाला विकासकामांसाठी आगामी कुंभमेळा निधीतून जवळपास अंदाजे साडेसतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या या तीर्थस्थळाच्या आराखड्यातील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता झाली असून, ऑनलाइन टेंडर प्रोसेसला ही कामे आहेत. सदर विकासकामांना दिवाळी नंतर सुरुवात होणार असल्याची माहिती सर्वतीर्थ संस्थानाचे महंत अॅड. किशोरदास श्रीवैष्णव यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
२०२७ च्या कुंभमेळा निधीतून सर्वतीर्थ टाकेद तीर्थस्थळाचा विकास व्हावा यासाठी आमदार माणिकराव कोकाटे, संस्थानचे महंत श्रीवैष्णव यांनी गेल्या तीन वर्षांपासून निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेंतर्गतही निधी आणण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे श्रीवैष्णव यांनी सांगितले आहे.
यासोबतच ओझर विमानतळाला जटायू विमानतळ असे नामकरण देण्यात यावे, यासाठी जिल्हा वकील संघाच्या वकील बांधवांच्या स्वाक्षरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. यासोबतच ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह एक निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे श्रीवैष्णव म्हणाले.
दरम्यान, या तीर्थस्थळाच्या विकास निधीसाठी स्थळ निरीक्षण करून कुंभमेळा विकासनिधी आराखड्यात समावेश करण्यासाठी कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकर पवार, आयुक्त शेखर सिंह, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, दिलीप बांबळे, पंचायत समिती बांधकाम अभियंता पी. एल. वाघ आदींसह अन्य सहकारी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असल्याचे श्रीवैष्णव यांनी सांगितले.