

कोल्हापूर : सुनिल सकटे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निमित्ताने महाविकास आघाडीने एकप्रकारे महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम केली आहे. माजी नगरसेवकांसह इच्छुकांच्या माध्यमातून 'फिल्डिंग' लावून त्या त्या प्रभागात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपले प्राबल्य कायम राखले आहे. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीतील घटक पक्षांना चांगलेच यश मिळाले आहे.
स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. राज्यात एकमेव पोटनिवडणूक असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होता. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. राज्य शासनाने प्रभाग रचनेची कार्यवाही करा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक प्रकारे महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच झाली.
शहरातील कसबा बावडा, सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत, राजारामपुरी, टाकाळा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ आदींसह विविध प्रभागांत ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीस महापालिकेच्या राजकारणाची झालर दिसून आली. या सर्व परिसरात महापालिकेत गतवेळी प्रतिनिधित्व केलेल्या माजी नगरसेवकांची एकप्रकारे कसोटी लागली.
बहुतांश भागांत काँग्रेस -राष्ट्रवादी-शिवसेना अशा महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून आला. अनेक पदाधिकार्यांना आपल्या भागातून मताधिक्य देताना आपला करिश्म अद्याप कायम असल्याचे दाखवून दिले. अनेक पदाधिकार्यांनी आपल्या मतदारसंघातून जाधव यांना मताधिक्य देताना आपली ताकदही आजमावण्याचे काम केले आहे.
शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक प्रकारे महापालिका निवडणूकीची रंगीत तालीमच झाली. अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी माजी नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकार्यांनी जीवाचे रान केले. त्यामुळे या निवडणूकीतून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूकीची चाचणी घेतली.