

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाची संरक्षक भिंत आज (दि. २५) सायंकाळी कोसळून ढिगाऱ्याखाली सापडल्याने एक महिला ठार झाली आहे. या ढिगाऱ्याखाली सापडलेली आणखी एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अश्विनी आनंदा यादव (वय ५९, रा. साई पार्क, भोसलेवाडी) असे मृत महिलेचे तर संध्या प्रशांत तेली (वय ३०, रा. वडणगे, ता. करवीर) असे जखमी महिलेचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही महिलांना ढीगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.
कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आज सायंकाळी (दि. २५) एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या. यापैकी दोन महिला या स्वच्छतागृहात गेल्या असताना खासबाग कुस्ती आखाड्याची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान भिंत कोसळल्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेतील ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दोन महिलांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले आहे. या महिलांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी आहे.