

गारगोटी; रविराज पाटील : भुदरगड तालुक्यातील पाटगाव मौनी सागर जलाशयातील पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून आहेत. पाटगाव मौनी सागर जलाशयातील पाण्याचा वापर करून अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारण्यात येणार होता. यामुळे भुदरगड वासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. हा प्रकल्प रद्द करावा यासाठी भुदरगड वासीयांसह सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. प्रकल्प रद्दा करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले होते. अखेर या सर्वांच्या मागणीस यश आले असून पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा प्रकल्प अखेर रद्द झाला आहे.
पाटगाव मौनी सागर जलाशयातील पाणी भुदरगड तालुक्याकरिता जीवनदायी आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील सुमारे ११५ गावातील १२ हजार ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. वेदगंगा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये या पाण्यावर नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा एक थेंबनी थेंब महत्वाचा आहे. प्रस्तावित पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फ़त अंजिवडे (ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) गावाजवळ नविन धरण बांधण्यात येणार असुन त्या धरणामध्ये तळंबा खो-यातील साठविलेले पाणी उचलुन पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार होते. या पाण्याचा वापर करुन 2 हजार 100 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा विचार होता. अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाटगाव प्रकल्पातील पाण्याचा वापर केल्यास भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थाता होती. यामुळे सदरचा प्रकल्प रद्द व्हावा याकरीता भुदरगड तालुक्यातील नागरीक व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी अनेक आंदोलने केली होती. या सर्वाचा विचार खरून अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाव्दारे केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून आदानी ग्रुप मार्फत 23 जानेवारी, 2024 रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केला असल्याचे कळविले असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.