

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस फायर झाल्याने तीन कामगार भाजून गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. किरणदेवी रामनरेश ठाकुर ( वय ४३ ), चंद्रकांत दत्तात्रय विभूते ( ५३ ) व रामप्रसाद दशरथ ठाकूर ( ५० ) अशी जखमींची नावे आहेत. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मयूर फाटा येथे असणार्या एका इंडस्ट्रीजमध्ये शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका इंडस्ट्रीजमध्ये फर्नेस मशिनवर काम सुरू होते. त्यावेळी किरणदेवी, चंद्रकांत व रामप्रसाद हे तिघेजण तेथेच काम करत होते. फर्नेसचा गॅस अचानक बॅक फायर झाला. गॅस बॅक फायर झाल्याने त्यातून बाहेर पडणार्या गरम वाफेमुळे त्याच्या कार्यक्षेत्रात काम करत असणारे तिघेही गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्व जण गोंधळून गेले. तेथील एका अधिकार्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली.
जखमी तिघांनाही उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. याबाबत सीपीआर पोलिस चौकीतून शिरोली एमआयडीसी पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.