

स्त्रिच्या गर्भावस्थेचा कालावधी साधारणपणे 37 आठवड्यांचा मानला जातो. त्यानंतर प्रसूती होणे अपेक्षित असते. परंतु काही कारणांनी या कालावधीपूर्वी प्रसूती होते. यालाच अकाली प्रसूत होणे असे म्हटले जाते. बाळंतपण हा स्त्रिचा पुनर्जन्म असतो, असे म्हटले जाते. पूर्वी आजच्या इतके प्रगत वैद्यकीय उपचार नव्हते तेव्हा प्रसूतीदरम्यान स्त्रिच्या किंवा नवजात बालकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. परंतु वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीबरोबर बाळंतपणातील बर्याच अडचणी दूर करणे शक्य झाले. तरीही गर्भावस्थेत पुरेशी काळजी न घेतल्यास काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
स्त्रिच्या गर्भावस्थेचा कालावधी साधारणपणे 37 आठवड्यांचा मानला जातोे. त्यानंतर तिची प्रसूती होणे अपेक्षित असते. परंतु काही कारणांनी या कालावधीपूर्वी प्रसूती होते. यालाच अकाली प्रसूत होणे असे म्हटले जाते. यात किती दिवस आधी प्रसूती झाली हा भाग महत्त्वाचा ठरतो आणि त्यानुसार जन्मलेल्या बालकाची विविध प्रकारे काळजी घेतली जाते. अशा बालकांना काही दिवस किंवा काही आठवडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. अशा बालकांची रोग प्रतिकारकशक्ती कमी असते. तसेच त्यांचा शारीरिक विकास अन्य सामान्य बालकांच्या मानाने कमी असण्याची शक्यता असते. अशा बालकांमध्ये मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत आदी अवयवांशी संबंधित विकार निर्माण होण्याची शक्यता असते.
मुख्यत्वे अपुर्या दिवसात जन्मलेल्या बालकाचे वजन कमी असते. त्यामुळे शरीराची वाढही पुरेशी झालेली नसते. नऊ महिन्यानंतर प्रसूती होऊन जन्मलेल्या मुलाचे वजन सर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलो असते. परंतु लवकर जन्मलेल्या मुलाचे वजन काही वेळा एक किलोपेक्षाही कमी असल्याचे आढळते. योग्य ते उपचार करून घरी आणल्यानंतरही बरीच काळजी घ्यावी लागते. त्याद़ृष्टीने घरातील सार्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे बाळाला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. बाळाचे कपडे, अंथरुण-पांघरुण याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. बाहेरून आलेल्या व्यक्ती थेट त्या बाळाच्या संपर्कात जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. याशिवाय अशा बाळाला घेऊन प्रवास करणे टाळावे. अशा मुलांच्या पचनसंस्थेचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. त्यामुळे भूक कमी लागणे, पोट दुखणे प्रसंगी जुलाब असे विकार निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी बाळ सतत रडते, किरकिर करत राहते. त्यामुळे प्रकृती आणखी खालावण्याचा धोका असतो. घरी आणल्यानंतरही बाळाला डॉक्टरांकडे वेळच्या वेळी तपासणीसाठी घेऊन जावे.
अकाली होणार्या प्रसूतीमागे अनेक कारणे आहेत. त्याबाबतची माहिती असणे आवश्यक ठरते. स्त्री तसेच पुरुष बीजामधील दोष, गर्भारपणातील समस्या, आघात-अपघात अशा काही प्रमुख कारणांमुळे गर्भवती स्त्री लवकर प्रसूत होऊ शकते. या शिवाय गर्भाशय अशक्त वा आकाराने लहान असणे, गर्भाशयात गाठी असणे, गर्भावस्थेत मानसिक ताण, भीती, नैराश्य यामुळेही प्रसूती लवकर होते. 35 वर्षांपेक्षा अधिक आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असणारी स्त्री गर्भवती असेल तर प्रसूती लवकर होण्याची शक्यता अधिक असते. या शिवाय गर्भवती स्त्रीला गर्भधारणेपूर्वी वा गर्भारपणात मधुमेह किंवा रक्तदाबासारखा विकार असेल, गर्भवती स्त्रीची उंची कमी असेल, वजन अधिक असेल, दोन गर्भारपणामध्ये सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल, त्या स्त्रीला यापूर्वी गर्भपाताच्या, गर्भस्रावाच्या समस्येला सामोरे जावे लागले असेल अशा कारणांमुळेही प्रसूती लवकर होऊ शकते.