

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 11 : कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 189 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 189 पैकी 52 उमेदवार नवे आहेत. दुसरीकडे 32 उमेदवार ओबीसी प्रवर्गातले असून 20 उमेदवार अनुसूचित जाती तर 16 उमेदवार अनुसूचित जमातीमधले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी दिली.
उमेदवारांची यादी तयार करताना युवा चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे भाजपचे कर्नाटक निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पहिल्या यादीमध्ये 8 महिलांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र हे शिकारपुरा मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांना त्यांच्या पारंपरिक चीकमंगळूर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर हे चिकबल्लापूर मधून तर राज्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण मल्लेश्वरम मधून नशीब आजमावतील. राज्यमंत्री आर. अशोक हे पद्मनाभनगर तसेच कनकपुरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते डी. शिवकुमार यांच्याशी आर. अशोक यांचा मुकाबला होईल. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 166 जागांवरील उमेदवार घोषित केले असून निजदने 93 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. येत्या 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर 13 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 13 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
भाजपने ज्या नेत्यांचे तिकीट कापले आहे, त्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा समावेश आहे. वरिष्ठ नेते व्ही. सोमन्ना यांना वरूणा मतदार संघात उतरविण्यात आले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामैया यांच्याशी होईल. भाजपने गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांना तर मुधोळमधून गोविंद काजरोळ यांना तिकीट दिले आहे. यादी जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत यादीवर अंतिम हात फिरवला.
हे ही वाचा :
Kohinoor Diamond : राज्याभिषेकात राणी कॅमिलांच्या मुकुटात नसेल कोहिनूर हिरा
पुण्यातील कोरेगाव पार्कात पारा 42.1 अंशांवर ! पुणे जिल्हा राज्यात टॉपवर