

कण्हेर ; पुढारी वृत्तसेवा : सातारा-मेढा रस्त्यावर नुने (ता.सातारा) येथे दुचाकी व चारचाकीच्या अपघातात कण्हेर येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकीमधील एक युवक गंभीर जखमी झाला असून या भिषण अपघातात दोन्ही वाहने चक्काचूर झाली आहेत. सुनील रामचंद्र वाघमळे (वय 42) व त्यांचा लहान मुलगा संस्कार (वय 9, दोघे रा. कण्हेर, ता. जि. सातारा), अशी अपघातात ठार झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुनिल वाघमळे हे आपल्या लहान मुलासह मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवरून गावाकडे येत होते. नुने येथील नंदीचा उतार याठिकाणी आले असता समोरुन येणार्या चारचाकीस त्यांच्या दुचाकीची जोराची ठोकर बसून अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील सुनिल वाघमळे व त्याचा लहान मुलगा संस्कार हे दोघे जागीच ठार झाले. तर चारचाकीमधील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातस्थळी रक्ताचा सडा व गाडीच्या पार्टचे तुकडे अस्ताव्यस्त पडले होते. अपघाताची माहिती मिळताच कण्हेरसह परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस करत आहेत. सुनील हे प्लंबरचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुनील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.