Xi Jinping Free Trade Statement : आशिया-पॅसिफिकची प्रगती खुल्या व्यापाराशिवाय अशक्य : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

Xi Jinping Free Trade Statement : आशिया-पॅसिफिकची प्रगती खुल्या व्यापाराशिवाय अशक्य : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
Published on: 
Updated on: 

शेन्झेन (चीन) : आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील स्थिरता आणि गतिमानता कायम ठेवायची असेल, तर देशांनी अधिक खुल्या व्यापाराचा आणि समान विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे ठाम मत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी (दि. १८) व्यक्त केले. वार्षिक ‘आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य’ परिषदेच्या निमित्ताने शेन्झेन येथे आयोजित जागतिक उद्योजकांच्या परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही सहभागी होणार आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे वाढलेले आयात शुल्क आणि ‘एनव्हिडिया’सारख्या प्रगत चिप्सवरील निर्बंधांमुळे अमेरिका-चीन संबंधांमध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नाव न घेता जिनपिंग यांनी संरक्षक धोरणांवर भाष्य केले. चीन केवळ आयात शुल्क कमी करणार नाही, तर नियम आणि मानकांमध्येही मोठ्या सुधारणा करून जागतिक गुंतवणूकदारांना अधिक संधी देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुतीन, अन्वर इब्राहिम यांची निर्बंधांवर टीका

२०१७ नंतर प्रथमच या परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्त्य निर्बंधांवर कडाडून टीका केली. ‘निर्बंध, आयात शुल्क आणि निर्यातबंदी यासारख्या आर्थिक दबावाच्या साधनांची उपयुक्तता आता संपली आहे,’ असे सांगत त्यांनी आशिया-पॅसिफिक देशांशी व्यापार वाढवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, २०३५ मध्ये ‘एपेक’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी रशियाने दावा केला आहे. दुसरीकडे, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मोठ्या अर्थव्यवस्थांनी लहान देशांवर स्वतःच्या अटी लादू नयेत, असे मत मांडले.

जागतिक राजकारणात नवी समीकरणे

अमेरिकेशी असलेल्या व्यापारी तणावामुळे इतर देश नवे पर्याय शोधत आहेत. मंगळवारी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि शी जिनपिंग यांच्यात परस्परांच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्यावर सहमती झाली. दरम्यान, गुरुवारी (दि. १९) या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांच्यात ऐतिहासिक पहिली ‘त्रिपक्षीय बैठक’ पार पडणार असून, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.