

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत लठ्ठ मांजर म्हणून नोंद असलेल्या रशियातील क्रंब्ज (Crumbs) या मांजराचा गेल्या आठवड्यात मृत्यू झालेला आहे. या मांजराला वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार दिला जात होता, पण यातच त्याचा मृत्यू झाला.
या मांजराच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे. क्रंब्जचे वचन १७ किलो होते आणि त्याची एक हॉस्पिटलच्या बेसमेंटमधून सुटका करण्यात आली होती. या मांजराला वजन कमी करण्यासाठी सूप, मांजराची बिस्किटे असे खाद्य दिले जात होते, तसेच त्याला ट्रेडमिलवर चालवले जात होते. त्यातून त्याचे ७ पौंड इतके वजन कमीही झाले होते. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे.
या मांजराच्या शरीरात कॅन्सरची गाठ झाली होती, पण शरीरात चरबी जास्त असल्याने ही गाठ ओळखता आली नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
"आम्हाला कॅन्सरचे निदान वेळीच करता आले नाही. मृत्यू वेळी त्याच्यात आजारपणाची कोणतीही लक्षणं दिसली नाही," असे संबंधित शेल्टरच्या मालकाने सांगितले आहे.
या मांजराची माहिती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. प्राणी सांभाळताना, त्यांचे पालकत्व घेतना येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे भान लोकांमध्ये आले पाहिजे, हा मुद्दा चर्चेत आला. प्राण्यातील स्थुलता कशी धोकादायक ठरू शकते, यावरही या घटनेने प्रकाश टाकला.