काय आहे ‘गुड फ्रायडे’? जाणून घ्या महत्त्‍व

Published on
Updated on

टीम पुढारी ऑनलाईन

आज जगभरात मोठ्या उत्‍साहात गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्‍व आहे. हा दिवस एक सण म्‍हणून साजरा करण्याची पद्धत जगभरातील ख्रिश्चन बांधवांमध्ये आहे. 

प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारे पर्व

'गुड फ्रायडे'ला ख्रिश्चन धर्मात विशेष महत्त्‍व आहे. प्रभू येशूंनी संपूर्ण जगासाठी दिलेले बलिदान दिल्याबद्दल हा दिवस एक उत्‍सव म्‍हणून साजरा केला जातो. येशूंनी मानव जातीला दिलेल्या नि:स्‍वार्थ प्रेम आणि क्षमा या संदेशाचे आजच्या दिवशी स्‍मरण केले जाते. यंदा हा दिवस आज (३० मार्च) रोजी साजरा होत आहे. 

विविध नावांनी साजरा होतो दिवस

धर्मग्रंथ बायबलनुसार, आजच्याच दिवशी प्रभू येशू यांना अनेक प्रकारच्या यातना देऊन सुळावर चढविण्यात आले होते. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अत्यंत कष्‍ट सहन करून आनंदाने बलिदान दिले. असे त्यांनी भूतलावर वाढणारे पाप आणि अत्याचाराचा शेवट करण्यासाठी केले. या दिवसाला होली फ्रायडे, ग्रेट फ्रायडे असेही संबोधले जाते. तर काहीजण या दिवसाला ब्‍लॅक फ्रायडे म्‍हणूनही साजरा करतात. 

काय आहे या दिवसाचे महत्त्‍व?

आजच्याच दिवशी ख्रिश्चन धर्माचे प्रवर्तक येशू ख्रिस्‍तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी बलिदान दिले. त्यामुळे ख्रिश्चन बांधव येशूंचे उपकार मानत उपवास करतात. तसेच चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना करतात. तसेच आजचा दिवस केवळ येशूंच्या संदेशाचे स्‍मरण करण्याबरोबरच ते आचरणात आणण्यासाठी प्ररित करणारा आहे.     

काय होते येशूंचे अंतिम वचन?

पापी व अत्याचारी लोकांनी मिळून येशूंना यातना दिल्या आणि त्यांना सुळावर चढविले. तेव्‍हाही प्रभू येशूंच्या मुखातून क्षमा आणि कल्याणाचा संदेशच बाहेर पडला. हा त्यांच्या क्षमाशील तत्‍वांचा आदर्श मानला जातो. "हे प्रभो, यांना माफ कर. कारण यांना माहीत नाही की ते काय करत आहेत.." असे शेवटचे उद्गार येशूंच्या मुखातून निघाले.

येशूंना सुळावर का चढवले?

आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी जेरुसलेममधील गॅलिली प्रांतात तरुण येशू लोकांना मानवता, बंधूभाव, एकता आणि शांतीचा संदेश देत होते. ज्यामुळे लोकांनी त्यांना परमपिता परमेश्वर मानण्यास सुरुवात केली. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवून त्याचा फायदा घेणार्‍या धर्मगुरुंचा तिळपापड व्‍हायला लागला. म्‍हणून त्यांनी येशूंना मानवतेचा शत्रू म्‍हणण्यास सुरुवात केली. परंतु, तरीही त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली.

येशूंना काटेरी मुकूट घालून चढविले सुळावर

येशूंची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता धर्मगुरुंच्या डोळ्यात खूपत होती. त्यामुळे त्यांनी रोमचा शासक पिलातूस याचे कान भरण्यास सुरुवात केली. स्‍वत:ला ईश्वराचा पुत्र मानणारा हा युवक पापी आहे. त्याने धर्माचा अपमान केला आहे, म्‍हणून येशूंवर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर त्यांना फटके मारण्यात आले. काट्यांचा मुकूट घालण्यात आला. हाल-हाल करून त्यांना सुळावर चढविले. 

कोणत्या ठिकाणी येशूंनी घेतला अंतिम श्वास?

बायबलनुसार, ज्या ठिकाणी येशूंना सुळावर चढविले होते त्या ठिकाणाला गोलगोथा या नावाने ओळखले जाते. ही एक उंच टेकडी आहे. ज्या ठिकाणी येशूंनी मृत्यूपूर्वी परमेश्वराची याचना केली. 'हे पिता, मी आपला आत्‍मा तुम्हाला सोपवत आहे," असे म्हणून यशूंनी प्राण त्यागले. 

राज्यात अंधार पसरला

धार्मिक ग्रंथ बायबलनुसार, येशू ख्रिस्‍तांना ६ तास सुळावर लटकवले. यावेळी शेवटच्या तीन तासात संपूर्ण राज्यात अंधार पसरला. त्यानंतर एक मोठा आवाज करत येशूंनी प्राण त्यागले. असे म्‍हणतात की यावेळी एक तेजोमय गोळा आला. त्यामुळे स्‍मशानातील शवपेट्या खुल्या झाल्या. पवित्र मंदिरातील पडदा फाटला. यामुळेच लोक आज दुपारनंतर चर्चमध्ये एकत्र येऊन तीन वाजता प्रार्थना करतात. या संपूर्ण आठवड्यालाच ख्रिश्चन धर्मात पवित्र मानले जाते. मात्र, चर्चमध्ये प्रार्थनेशिवाय कोणताही उत्‍सव करण्यात येत नाही. 

 

Tags : yeshu khrist, good friday, Jesus Christ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news