उदक तारक, उदक मारक | उदक ना ना सौख्यदायक || पाहता उदकाचा विवेक | अलौकिक आहे उदक ||

Published on
Updated on

– अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन

लहानपणापासून आम्ही शिकत आलो की, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या पाच मानवाच्या मुलभूत गरजा आहेत; पण या पाच मानवाच्या मुलभूत गरजा ज्याच्या पायावर उभ्या आहेत. त्या पाण्याला मात्र यामध्ये आम्ही का समाविष्ठ करू शकलो नाही? आज अनेक सामाजिक संस्था, सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते पाणी हा विषय हाताळताना दिसतात; पण पाणी हा विषय जमीन हाताळण्यासारखा विषय नाही. तर प्रत्यक्ष कृतीकार्यक्रमामध्ये आणण्याचा विषय आहे. आता विविध राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पावसाचा विचार करता सामुहिक आणि वैयक्तिक पातळीवर जल संवर्धन कार्यक्रमाची आखणी करण गरजेचं आहे. तरच "तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा तहान लागायच्या अगोदर विहीर खणणं जास्त सोयीस्कर…

वाचा ः 'पोलीस अधिकार्‍यांनी मंत्र्यांविरोधात तक्रार करावी'

इतिहासात जल संवर्धनाच एक ठळक उदाहरण आहे. इ.स १४ व्या शतकात दौलताबादसारख्या ठिकाणी, डोंगरावरच पाणी अडविण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत १ मीटर उंचीची, २ किलोमीटर लांबीची एक मोठी भिंतच बांधली. त्याच्या सह्याने डोंगरावरच पावसाचं पाणी डोंगराच्या पायथ्याजवळ एका विशिष्ठ ठिकाणी (सखल भागात) साठविण्यात आलं आणि पुन्हा तेच पाणी २१० मीटर उंचीवर नेण्यात आलं आणि गावाची पाणी समस्या पूर्णपणे मिटविण्यात आली. यामध्ये आश्चर्याच्या तीन गोष्टी लक्षात येतात. पहिली, एकही पैसा खर्च न करता तो प्रकल्प लोकांनी येऊन उभा केला, दुसरी, कोणत्याही प्रकारच्या विजेच्या मोटारीचा वापर न करता ते पाणी २१० मीटर उंचीवर नेण्यात आले. तिसरी, हा प्रकल्प एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल चारशे वर्ष जीवंत होता. सांगायचं तात्पर्य हे की, "एक चांगला विचार फक्त एकाच व्यक्तीने करून काहीच उपयोग नसतो त्या एका चांगल्या विचारला एक हजार माणंसांची साथ लाभली तर एक हजार माणसांचे दोन हजार हात जे कार्य करतील त्या कामाची उंची कैक पटीने मोठी असेल."

वाचा ः …तर, आज परमबीर सिंह हे विरोधकांची 'डार्लिंग' झाले आहेत; शिवसेनेची भाजपवर टीका

'पाणी म्हणजे जीवन आहे', हे वाक्य प्रत्येकाने विद्यार्थीदशेत असताना वाचलं किंवा ऐकलं असेल. पण परीक्षा झाली, गुण मिळाले, इयत्ता बदलली हे वाक्य आणि त्याचा वाक्यार्थ आम्ही लक्षार्थासह विसरून जातो आणि 'ये रे माझ्या मागल्या" म्हणून जीवन जगायला लागतो. जीवनाचं दुसरं नाव पाणी आहे, हे आपण विसरता कामा नये. या पाण्याची रासायनिक व्याख्या स्पष्ट करताना विज्ञान आपल्याला सांगतं की, हायड्रोजनचे २ अणू आणि ओक्सिजनचा १ अणू यांचा मिलाप म्हणजे पाणी… पाणी या विषयावरती आपल्या पंचवीस वर्ष खर्च करणारा 'इमेटो' नावाचा शास्त्रज्ञ आपल्या 'massages from water' या पुस्तकात पाण्याची भावनिकता स्पष्ट करताना असं लिहितो कि, 'पाणी एखाद्या सजीवासारखं असतं. म्हणजेच मानवाच्या कंपनाना, कल्पनांना, विचारांना, शब्दांना आणि भावनांना पाणी एखाद्या संवेदनशील प्राण्यासारखं प्रतिसाद देतं. या पाण्याचा प्रभाव स्पष्ट करताना समर्थ रामदास स्वामी आपल्या 'आनंदवनभुवन-श्लोक क्र. १६-४-२३' म्हणतात की, 'उदक तारक, उदक मारक | उदक ना ना सौख्यदायक || पाहता उदकाचा विवेक | अलौकिक आहे उदक ||', याचा अर्थ असा की, पाणीच आपल्याला मारत, पाणीच आपल्याला तारत, पाणीच आपल्याला विवेक शिकवत असं हे पाणी अलौकिक आहे.

वाचा ः मनसुख हत्या; मुख्य संशयित सचिन वाझेच

'लोकसहभागातून जलव्यवस्थापन' हा मुद्दा विचारात घेतला की समोर काही उदाहरणं लक्षात येतात. हिवरे बाजाराचा हिरवा बाजार कसा झाला? हा प्रश्न तेथिल लोकांना विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, सर्वात पहिल्यांदा आम्ही दोन निर्णय घेतले… पहिला – उन्हाळी पिके न घेण्याचा, दुसरा निर्णय – कोणीही आपल्या शेतात विहिरी आणि कुपनलिका खोदणार नाही. याचा परिणाम असा झाला की, जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याची पातळी उंचाविण्यास मदत झाली, गुजरातमधील सौराष्ट्राचा विचार केला की, तिथला प्रत्येक माणूस आपलं घर बांधत असताना घराच्या पायामध्ये पाण्याची टाकी बांधतो आणि घर बांधून झाल्यानंतर घराच्या छातावार पडलेलं पावसाचं पाणी तो त्या टाकीमध्ये साठवतो अन तेच पाणी पुन्हा उन्हाळ्यात वापरतो. राजस्थानचा विचार केला की, डॉ. राजेंद्रसिंह यांनी पाण्याचा थेट संबंध दैवत्वाशी लावून दिला आणि लोकांना एकत्र करून सुमारे २ हजार तलावांची निर्मिती केली. येणाऱ्या दिवसात पाऊस जोरदार सुरू होण्यापूर्वी समाजहिताचा विचार करणारी आणि पाणी या विषयाकडे गंभीरतेने पाहणाऱ्या व्यक्तींसमोर आदर्श असावेत.

पाण्याबद्दलची वास्तव जाणीव करून देत असताना हे लक्षात घेणंदेखील गरजेचं आहे की, ज्यावेळी आणि मुंबईसारख्या शहरांतील दरडोई ३०० लिटर पाणी दिलं जातं होतं त्यावेळी फक्त दोन दिवस घरातील नळाला पाणी आलं नाही म्हणून या शहरातील माणसांनी हातात रिकामी भांडी घेवून रस्त्यावर उतरली होती आणि रास्तारोको आंदोलन घडवून आणली; पण त्याचवेळी दुष्काळग्रस्त भागात आठ-दहा माणसांच्या वाट्याला फक्त अडीचशे लीटर पाणी… तरीसुद्धा 'पानी तो पानी है, पानी जिंदगानी है' असं म्हणत पाण्याचा पुन्हा-पुन्हा वापर करताना दिसत होते. हरितक्रांती घडवून आणणार आघाडीचं पाहिलं राज्य म्हणून आपण पंजाबकडे पाहतो; पण पंजाबने हे करत असताना जमिनीच्या पोटात पाणी शिल्लक ठेवलं नाही आणि म्हणून तत्कालीन सरकारने असा निर्णय घेतेला होता की, १४१ तालुक्यांपैकी १३० तालुक्यांमध्ये विहिरी आणि कुपनलिका खोदण्यास पूर्णपणे बंदी घातली. मतितार्थ असा की, ज्यांना पाणी मिळतं त्यांना पाण्याची किंमत कळत नाही आणि ज्यांना पाणीच मिळत नाही त्यांना पाण्याची किंमत कळल्याशिवाय राहत नाही.

वाचा ः करीम लाला, हाजी मस्तानसारखे 'स्मगलर्स'देखील 'या' पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने थरथरायचे!

'पाण्यासाठी राजकारण आणि राजकारणासाठी पाणी' हे सूत्र पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी मांडून हे पाण्याच गणित सोडवत राहिले आणि म्हणून त्यांनी पाणी शुध्द करण्याची सर्वात कमी खर्चिक पद्धत स्वीकारली. पाणी शुध्द करण्यासाठी 'क्लोरिन' नावाचा जो रासायनिक पदार्थ वापरला जातो. त्या पदार्थामुळे कावीळ, गैस्ट्रो, एन्ट्रायसिस त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, अपंगत्व आणि म्हतारचाळ यासारखे असाध्य रोग होतात. पाणी प्रदूषणाचा विचार केला की, एकट्या माणसांच्या वैयक्तिक कृतीमुळे एकून नद्यांच्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी हे प्रदूषित झालंय. रामायण आणि महाभारताच्या साक्षीदार असणाऱ्या गंगा व यमुना नद्यांची अवस्था आज फार बिकट आहे. त्याबद्दल असं म्हणता येईल की, "गंगा जब गांगोत्री में बहती है तब वो बडी पवित्र होतो है पर वो जाब कानपूर मै आती है, तब वो गटर बन जाती है" हे वास्तवदेखील आपल्याला नाकारून चालणार नाही. १९५६ साली यमुना नदीमध्ये कारखान्यातील सांडपाणी मिसळल्यामुळे ३० हजार लोकांना कावीळ झाली होती तर २०० लोक जागीच मृत्युमुखी पडले होती. आजदेखील दिवसाला सुमारे १२०० बालके हे अस्वच्छ पाणी पिल्यामुळे मृत्युमुखी पडतात. तर व्हिक्टर शाऊबर्गर असं असं म्हणतो की, आजही जगातील ५ माणसांपैकी एका माणसाला स्वतःची तहान भागवता येत नाही. इथं कवी पाण्याचं वास्तव सागतो की,

उदक, जल, नीर, तन्नीर, तोय

पाण्यासाठीच आम्ही झगडतोय

इथं पाणीच डोळ्यातून पाणी काढतंय

पाणी-पाणी करताना जीवाचं पाणी होतंय

तहानलेला जीव पाणी-पाणी करतोय

पाणी-पाणी करताना दुसऱ्याला पाणी पाजतोय

इथं पाण्यासाठीच पहाट होते, पाण्यासाठीच रात्र होते

पाणी हेच जीवनाचे एकमात्र ध्येय होते…

आम्हाला आमचा चालू वर्तमानकाळ बदलावयाचा असेल तर आम्हाला आमच्याच भारताचा भूतकाळ आणि परराष्ट्राचा वर्तमान काळ यांचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. कारण जगाच्या नकाशात ज्या देशाचं अस्तित्वही दाखवण शक्य नाही तो इस्त्राईल नावाचा देश पाण्याचा एक थेंब सहा वेळा वापरतो अन नंतर तो समुद्राला जाऊन मिळतो. ज्या देशाच्या नावात हिरवळ पण गावात पाण्याचा थेंब नव्हता तो फिनलंड नावाचा देश जलसमृद्ध देशांचा यादीमध्ये अव्वल आहे. जॉर्डन आणि कॅलिफोर्निया नावाचे देश असं पका दावा करतात की, आम्ही आमच्या प्रयत्नाच्या जोरावर जर पाण्याची पातळी दोनशे घनमीटर असेल तर ती एकाच वर्षात चारशे घनमीटर पर्यंत वाढवू. हा आत्मविश्वास आमच्यामध्ये दिसायला हवा.

वाचा ः देशमुखांवर टांगती तलवार!

आम्हाला पाण्याचं दुर्भिक्ष्य संपवायचं असेल तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जलव्यवस्थापनासंबंधीच्या सांगितलेल्या नियमांपासून सुरुवात केली पाहिजे. पहिला नियम जी माणसं पाणी मागण्याचा हक्क सांगतात त्या माणसांनी पाणी वाचविण्याच कर्तव्यही विसरता कामा नये. दुसरा नियम लोकसहभागाच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन जलसंवर्धन केलं पाहिजे आणि ते जतन करून ठेवण्यासाठी काही नियम केले पाहिजेत आणि त्या नियम पाळले पाहिजेत. तिसरा नियम गुरेचराई व मोकाट जनावरे यांच्यावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. रेन वाटर होर्वेस्टिंग, झीरप खड्डा, कारंजे प्रयोग, वैयाक्तिक पातळीवर पाण्याचा पुनर्वापर त्याचा बरोबर लडाखमधील झिंग पद्धत, नागालँडमधील झाबो पद्धत, राजस्थानमधील जोहड पद्धत आणि तामिळनाडू मधील उरणी पद्धत यांचा वापर करायला हवा. तर, आपण पाणी समस्या पूर्णपणे सोडवू!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news