वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतातून झालेल्या प्रचंड विरोधानंतरही व्हॉट्सअॅपने आपली नवी व वादग्रस्त 'प्रायव्हेट पॉलिसी अपडेट' पुढे रेटण्याचे ठरवून टाकलेले आहे. या अॅपने बदललेल्या अटी-शर्ती भारतातून झालेल्या विरोधानंतर तूर्त स्थगित ठेवलेल्या असल्या तरी त्या फार काळ स्थगित राहाणार नाहीत. व्हॉट्सअॅपकडून गुरुवारी तसे स्पष्ट करण्यात आले आहे. आपले नवे धोरण लागू करण्याच्या योजनेवर व्हॉट्सअॅपने काम सुरू केले आहे.
नवीन अटी शर्तींमुळे तुम्ही मित्र, मैत्रिणींना, कुटुंबीयांना केलेल्या मेसेजेसवर काहीही परिणाम होणार नाही, असे व्हॉट्सअॅपकडून वारंवार सांगण्यात येते. याउपर नव्या अटी शर्तींमुळे व्हॉट्सअॅप 'फेसबुक' या पालक प्लेटफॉर्मसोबत यूझर्सचा काही डेटा शेअर करू शकणार आहे. 'प्रायव्हसी'बाबतचे (खासगीपणा) बाबतचे व्हाटस् अॅपचे नवे धोरण कुठल्याही परिस्थितीत 15 मे पासून लागू होणार आहे. व्हाटस् अॅपचही नवी अट तुम्हाला मान्य करावीच लागेल. ती मान्य न केल्यास तुम्ही या अॅपचा वापर करूच शकणार नाही. व्हाटस् अॅपने समाजमाध्यमातून जारी केलेल्या नव्या निवेदनात म्हटले आहे, की यूझर आणि त्याच्या खासगीपणादरम्यान काहीही येणार नाही. नव्या अपडेटनंतर व्हाटस् अॅप चॅटवर एक डॉक्युमेंटसद़ृश चॅट दिसेल. ते उघडल्यानंतर तुम्हाला पॉलिसीबाबत माहिती मिळेल. आम्ही तुमचे खासगी मेसेज वाचतही नाही आणि बघतही नाही, याचा पुनरुच्चार त्यात असेल.नवे अपडेट फक्त व्यवसाय आणि ग्राहकांच्या दरम्यानच्या मेसेजेसबद्दल माहिती देईल. 15 मेपासून ही नवी योजना लागू होणार आहे. तुम्हाला (युझर्सना) नव्या अपडेटबद्दल जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
नवे काय?
1) तुम्ही तुमच्या व्हाटस् अॅपवर व्यवसायांशी संबंधित गोष्टी फोन वा ईमेलच्या तुलनेत अधिक सोयीने व वेगाने करू शकाल.
2) या सुविधेचा वापरही अनिवार्य नाही. तुम्हाला करायचा असेल तर करा. तो करणे बंधनकारक नाही.
3) व्यावसायिकांशी चॅट करायचे की नाही, हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. तुम्ही व्यावसायिकांना आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढू शकता. ब्लॉक करू शकता.
याआधी व्हॉटस् अॅपने काय म्हटले होते?
8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार असलेल्या पॉलिसीचा स्वीकार न केल्यास तुम्ही अकाऊंटचा वापर करू शकणार नाही. आमची सेवा घ्यायची तर तुम्ही जे कंटेंट (मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ) अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड वा रिसिव्ह करतात तो आम्ही (व्हाटस् अॅप) वापरू शकतो. वितरित करू शकतो. पुनर्निमित करू शकतो. डिस्प्ले करण्याचाही हक्क आम्हाला असेल.