

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशच्या अनेक भागात रविवारी (दि.4) पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशाच्या विविध भागांतून हजारो निदर्शक जमले होते. यादरम्यान रविवारी सत्ताधारी अवामी लीगचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाली. या हाणामारीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 30 हून लोक अधिक जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, चकमकीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी गणभवन येथे सुरक्षाविषयक राष्ट्रीय समितीची बैठक बोलावली आहे.
द हिंदूच्या वृत्तानुसार, बांगलादेशातील हिंसाचारात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. त्याचवेळी, चकमकीनंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी जोरदार निदर्शने करत आहेत. यादरम्यान हिंसाचार उसळला. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, जे देशभरात निषेधाच्या नावाखाली तोडफोड करत आहेत ते विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत. अशा घटकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. आंदोलनासाठी बाहेर पडलेले विद्यार्थी पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीला लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस, रॅपिड ॲक्शन बटालियन, बॉर्डर गार्ड बांगलादेशचे प्रमुख आणि इतर उच्च सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आणि गृहमंत्रीही उपस्थित होते.
यापूर्वी पोलीस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. विद्यार्थी आंदोलक देशातील वादग्रस्त आरक्षण कोटा प्रणाली रद्द करण्याची मागणी करत होते, ज्या अंतर्गत 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील योद्धांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले होते.