लंडन : वृत्तसंस्था
लंडनच्या न्यायालयाने 'किंगफिशर'चा पळपुट्या मालक विजय मल्ल्या याला मोठा झटका दिला आहे. मल्ल्याला दिवाळखोर जाहीर केले आहे. स्टेट बँकेच्या पुढाकाराने भारतीय बँकांनी मिळून मल्ल्याला दिवाळखोर जाहीर करण्याबाबत विनंती करणारी याचिका दाखल केली होती. त्याविरुद्ध मल्ल्याने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
किंगफिशर एअरलाईन्समध्ये जनतेचा पैसा गुंतलेला असल्याने मला दिवाळखोर जाहीर करता येणार नाही, असा युक्तिवाद मल्ल्याच्या वतीने करण्यात आला; पण न्यायालयाने तो ग्राह्य धरला नाही. या निर्णयामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्टेट बँक आता मल्ल्याच्या मालकीची संपत्ती लिलावात काढून आपले कर्ज वसूल करू शकेल.
लंडन न्यायालयाने भारतातील मल्ल्याच्या संपत्तीला बहाल केलेले सुरक्षा कवच आता काढून घेतले आहे. स्टेट बँकेच्या पुढाकारात भारतीय बँका आता मल्ल्याकडून कर्ज वसुली करू शकतील. या बँकांनी मिळून किंगफिशर एअरलाईन्सला 9 हजार कोटी रुपयांच्या जवळपास कर्ज दिलेले आहे.