Venezuela Earthquake: भयकंपाने लोकांनी रात्र काढली रस्त्यांवर

'ला गुआयरा' आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित
Venezuela Earthquake
Venezuela Earthquake
Published on
Updated on

काराकास : व्हेनेझुएलातील शक्तिशाली भूकंपाने सर्वांत मोठी हानी राजधानी काराकास आणि किनारपट्टीवर असलेल्या 'ला गुआयरा' या राज्यात झाली. राष्ट्रीय सुट्टीचा आनंद घेऊन रात्री झोपण्याची तयारी करणारे भूकंपाच्या तीव्र धक्क्याने भयभीत झाले. मिळेल ते साहित्य घेऊन लोक रस्ते आणि मोकळ्या मैदानाच्या दिशेने धावले. जीव मुठीत धरून अनेकांनी रात्र रस्त्यांवरच काढली. भूकंपाने अनेक घरे आणि इमारतींची प्रचंड पडझड झाली आहे. सातत्याने येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनंतरच्या धक्क्याने लोक घरात परतण्याचे धाडस करू शकले नाहीत.

हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी उत्तर भागातील किनारपट्टीवर असलेले आणि सर्वाधिक प्रभावित झालेले 'ला गुआयरा' हे राज्य आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, अमेरिका, डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वाडोर आणि मेक्सिकोची बचाव पथके लवकरच येथे पोहोचत आहेत. अनेक कुटुंबे मुलांसह आणि जीवनावश्यक साहित्यासह खुल्या मैदानांवर आणि रस्त्यांवर रात्रभर थांबून राहिली. बाधित झालेल्या इमारती कधीही कोसळू शकतात, अशी भीती लोकांना सतावत आहे. भूकंपानंतर सातत्याने आफ्टरशॉक्स जाणवत आहेत. प्रशासनाने लोकांना बाधित झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शाळांचे रूपांतर मदत छावण्यांमध्ये

सरकारने देशभरातील शाळा सध्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की, काही शाळांमधून मदत छावण्या (रिलीफ कॅम्प) सुरू केल्या जातील. या ठिकाणी भूकंपाने बाधित झालेल्या कुटुंबांना आश्रय दिला जाईल.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मुलांना जिवंत बाहेर काढले

ला गुआयरा येथे कोसळलेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मुलांना जिवंत वाचवण्यात आले आहे. मदत आणि बचाव पथके अजूनही बाधित भागांत लोकांचा शोध घेत आहेत. रॉड्रिग्ज यांनी बेपत्ता लोक आणि पडलेल्या घरांची माहिती ‘व्हेनॲप’वर देण्याचे आवाहन केले आहे.

आठ देश मदतीसाठी सरसावले

दक्षिण अमेरिकेतील ८ देशांनी व्हेनेझुएलाला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ब्राझील, अर्जेंटिना, पेरू, मेक्सिको, कोलंबिया, बोलिव्हिया, कोस्टा रिका आणि एल साल्वाडोर यांनी संवेदना व्यक्त करत मदत आणि बचावकार्यात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. या देशांच्या सरकारांनी स्वतंत्र निवेदने जारी करून भूकंपातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच गरज पडल्यास मदत साहित्य, मानवतावादी मदत आणि बचाव पथके (रेस्क्यू टीम) उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन देशांच्या संघटनेकडून मदतीचे आश्वासन

ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेटस्‌चे सरचिटणीस अल्बर्ट रामदीन यांनी व्हेनेझुएलामध्ये आलेल्या भूकंपाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, नुकसानीची नेमकी आणि पूर्ण माहिती अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, तरीही या कठीण काळात व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू.

सिमेंटचे ढीग आणि धुळीचे साम्राज्य

माजी खासदार विल्मर अझुआजे यांनी मैकेतिया विमानतळावर भूकंप झाला तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. यामध्ये सिमेंटचे ढीग आणि धुळीचे साम्राज्य दिसत आहे.

बहुतेक मी मरणार; एका महिलेचा बहिणीला मेसेज

बीबीसीच्या पत्रकार व्हॅलेंटिना ओरोपेझा यांनी सांगितले की, एका मित्राने मला 'लॉस पालोस ग्रँडेस' भागातील एक व्हिडीओ क्लिप पाठवली. यामध्ये एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली होती. माझी आई आणि बहीण याच भागात राहतात. दोन तासांनंतर जेव्हा मला पुन्हा बहिणीचा आवाज ऐकू आला, तेव्हा ती म्हणाली, आम्हाला वाटले होते की, आपण मरणार. मी वाचले तर आपल्या घरी परत येईन. त्यापूर्वीच माझी बहीण व्हेरोनिका हिचा व्हॉटस्ॲ‌पवर ऑडिओ मेसेज आला होता. तिने, आमचे घर खूप जोरात हलत आहे, असे त्यात म्हटले होते.

त्यावेळी काराकासमध्ये नक्की काय घडत आहे, हे मला समजले नाही. दोन तासांनंतर मी व्हेरोनिकाला फोन केला, पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर मला काराकासमधील पत्रकारांच्या व्हॉटस्ॲ‌प ग्रुपवर भूकंपाची माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news