
बीजिंग : आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी शास्त्रज्ञांनी हृदयविकारांसारख्या घातक आजारांना रोखण्यासाठी संभाव्य लस विकसित केल्याचा दावा केला आहे. नाजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हृदयविकारावर प्रभावी ठरणारी नॅनो लस विकसित केल्याचा दावा केला.
नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये या संदर्भातील शोधनिबंधही प्रकाशित करण्यात आला आहे. चिनी संशोधकांनी शोधून काढलेली ही लस वैद्यकीय क्षेत्रातील मोठी प्रगती आहे. चिनी संशोधकांनी सुरुवातीला उंदरांना उच्च कोलेस्ट्रॉल असलेला आहार दिला, यामुळे त्यांच्या शरीरातील प्लेकचे प्रमाण झपाट्याने वाढले. यानंतर नवीन विकसित करण्यात आलेल्या लसीचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. ही लस उंदरांच्या शरीरात जमा होणारे प्लेक रोखण्यात यशस्वी ठरली, असे चीनमधील नानजिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले.