बीजिंग : वृत्तसंस्था
अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. तैवान सीमेवर चिनी सैन्यांची वाढती कुमक आणि युद्धनौका यामुळे अमेरिकेने पुन्हा एकदा आपले विमानवाहू जहाज यूएसएस रोनाल्ड रिगन दक्षिण चीन सागरात तैनात करून युद्ध सराव सुरू केला आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेने चीनलगतच्या एका बेटाजवळ युद्ध सरावही केला.
यूएसएस रोनाल्ड रिगनचे वायुदल अधिकारी जोशुआ फागन म्हणाले, या भागातील प्रत्येक देशाला समुद्रात जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार संचालन करण्यासाठी मदत करण्याचे दक्षिण चीन समुद्रातील युद्धाभ्यासाचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात चीनचा जपान, इंडोनेशिया, तैवान, ब्रुनेई आणि फिलिपिन्स या देशांसह अनेक देशांबरोबर वाद आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची हेनान बेटावर प्रशिक्षण घेण्याची योजना आहे. जपानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार यावेळी चिनी सैन्य तैवान-नियंत्रित बेटे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकते. यासाठी चीनने तैवानच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात सागरी कमांडो, लँडिंग शिप्स होव्हरक्राफ्ट आणि लष्करी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.