

साना, वृत्तसंस्था : हौथी बंडखोरांना लक्ष्य बनवण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने येमेनमधील महत्त्वाचे इंधन पुरवठादार असलेल्या रस इस्सा बंदरावर हल्ला करून ते नष्ट केले. या हल्ल्यांमध्ये किमान 38 लोकांचा मृत्यू झाल्याचे हौथींनी शुक्रवारी सांगितले.
या बंदरावरचा हल्ला हौथींना इंधन आणि निधी मिळवण्यास आडकाठी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला, असे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले. इराणचे समर्थन असणार्या हौथींनी गेल्या काही महिन्यांत रेड सी आणि अडेनच्या आखातात नागरी आणि लष्करी जहाजांवर सातत्याने हल्ले केले आहेत.
अमेरिकन लष्कराच्या निवेदनानुसार हौथी दहशतवाद्यांचे इंधनाचे हे स्रोत नष्ट करून, त्यांचे बेकायदा उत्पन्न रोखण्याचा आमचा उद्देश होता. हे उत्पन्नच गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या दहशतवादी कारवायांचा मुख्य आधार ठरला आहे.
रस इस्सा बंदर हे येमेनच्या पश्चिम किनारपट्टीवर रेड सीवर आहे. अमेरिकेने हौथींना परदेशी दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतरही या बंदरावरून इंधन पुरवठा सुरूच होता.
हौथी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अनीस अल-असबाही यांनी सांगितले की, या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. रस इस्सा तेल बंदरावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यामुळे 50 कामगार आणि कर्मचारी जखमी झाले आहेत, असे त्यांनी एक्सवर सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून काही मृतदेहांचे अवशेष ओळखण्याचे काम सुरू आहे.
हौथींच्या अल-मसीरा वाहिनीने शुक्रवारी पहाटे प्रसारित केलेल्या चित्रफितींमध्ये हल्ल्यानंतर बंदराभोवती मोठा स्फोट आणि धुराचे प्रचंड लोट दिसून आले. सिव्हिल डिफेन्स आणि पॅरामेडिक्स टीम पीडितांचा शोध घेण्याचा आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अल-असबाही यांनी सांगितले.
हौथींच्या हल्ल्यांमुळे जगातील सुमारे 12 टक्के सागरी वाहतूक करणार्या स्वेझ कालव्यावरील जहाजांना पर्यायी मार्गाने दक्षिण आफ्रिकेच्या टोकाने फिरावे लागत असल्याने खर्च आणि वेळेत वाढ झाली आहे. हौथींवर अमेरिकेने प्रथम हल्ले सुरू केले ते तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या काळात. त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, जोपर्यंत हौथी बंडखोर जलवाहतुकीसाठी धोका ठरत आहेत, तोपर्यंत सैन्य कारवाई सुरूच राहील.