US-Iran War | अमेरिका राजी, इराणची नाराजी

आज कराराची शक्यता : अध्यक्ष ट्रम्प यांचा घाई न करण्याचा इशारा
US-Iran War |
US-Iran War | अमेरिका राजी, इराणची नाराजी
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एक शांतता करार आजच (मंगळवारी) होण्याची दाट शक्यता आहे, असे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी दिले. ते म्हणाले की, इराणसाठी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनी खुली करण्याबाबत एक ठोस प्रस्ताव तयार आहे. गेल्या 8 एप्रिलपासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू असली, तरी अमेरिकेने इराणच्या बंदरांची आर्थिक नाकेबंदी केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत सांगितले की, मी माझ्या प्रतिनिधींना करारासाठी घाई न करण्यास सांगितले आहे; कारण वेळ आमच्या बाजूने आहे. अंतिम स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत इराणवरील नाकेबंदी पूर्ण ताकदीने लागू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेचा प्रश्न अजूनही अनिर्णीत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही ट्रम्प यांच्याशी चर्चा करून, अंतिम करारात इराणचा अणुधोका संपुष्टात आणण्याची मागणी केली.

बहुतांश मुद्द्यांवर सहमती : इराण

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीच्या करारासाठी अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. मात्र, हा करार त्वरित होईल, असा कोणताही दावा सध्या करता येणार नाही, असा सावध पवित्रा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी घेतला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, चर्चेत असलेल्या बहुतांश मुद्द्यांवर आम्ही एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत, हे म्हणणे योग्य ठरेल. मात्र, याचा अर्थ करारावर त्वरित स्वाक्षरी होईल, असा नाही.

14-सूत्रीय आराखडा आणि अण्वस्त्र कार्यक्रम

14-सूत्रीय आराखडा मुख्यत्वे संपूर्ण प्रदेशातील (ज्यामध्ये लेबनॉनचाही समावेश आहे) युद्ध संपवण्यावर केंद्रित असल्याचे बकाई यांनी ठामपणे सांगितले. वॉशिंग्टनसाठी कळीचा मुद्दा असलेला इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम या आराखड्यात समाविष्ट नाही. युद्धबंदीच्या 14-सूत्रीय आराखड्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्यानंतरच अण्वस्त्र कार्यक्रमावर स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news