

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेने 254 उत्पादनांना आयात करातून सूट देण्याची घोषणा केली असून, यापैकी 229 कृषी उत्पादने आहेत. यामुळे अमेरिकेला भारताकडून होणार्या सुमारे 1 अब्ज डॉलरच्या निर्यातीस याचा लाभ होणार आहे.
अमेरिकेत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी कृषी व प्रोसेस्ड फूड उत्पादनांवरील आयात करातून सूट देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एप्रिल महिन्यातील आयात कर घोषणेमुळे भारतीय निर्यातीला मोठा फटका बसला होता. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशाद्वारे कॉफी, चहा, उष्णकटिबंधीय फळे, सुका मेवा, मसाले आणि इतर अनेक वस्तूंवरील आयात कर रद्द करण्याची घोषणा केली. व्हाईट हाऊस प्रशासनाने सुधारित सूची जाहीर केली असून, 13 नोव्हेंबरपासून ती लागू झाली आहे. वाढत्या ग्राहक महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. संबंधित वस्तूंवरील अमेरिकेचे आयात करमुक्त मूल्य 1 अब्ज डॉलर (भारतीय निर्यात) आहे.
भारतीय निर्यातीवर कसा परिणाम ?
अमेरिकेने 200 हून अधिक खाद्य वस्तूंवरील कर हटवल्याने भारतीय कृषी निर्यातदारांसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. एप्रिलनंतर अनेक महिन्यांपासून मागणी घटलेली होती.9 युरोपियन युनियन आणि व्हिएतनामवर 20 टक्क्यांपेक्षा कमी आयात कर आहे; पण भारतावर 50 टक्के आयात कर लावण्यात आला होता. अमेरिकेसोबत व्यापार करणार्या देशांमध्ये हा सर्वाधिक कर आहे. त्यामुळे सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय निर्यात 12 टक्क्यांनी घसरून 5.43 अब्ज डॉलरवर आली होती.
चहा, कॉफी, मसाले आणि काजू निर्यातीवर सर्वाधिक परिणाम झाला होता. आता करमुक्त सूट मिळाल्यानंतर निर्यात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारत अमेरिकेला विविध मसाले प्रामुख्याने निर्यात करतो. त्याचे वार्षिक निर्यात मूल्य पुढीलप्रमाणे आहे. मसाले 358 दशलक्ष डॉलर, चहा व कॉफी उत्पादन 82 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले की, या निर्णयामुळे किमान 2.5 अब्ज डॉलर निर्यातीला चालना मिळेल. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, भारतीय निर्यात काही उच्च मूल्य मसाले व विशेष उत्पादनांवर केंद्रित आहे. त्यामध्ये मुख्य निर्यात श्रेणीत मिरी, सिमला मिरची, आले, हळद, करी मसाला, जिरे, वेलदोडा, चहा, कोको दालचिनी आणि लवंगाचा समावेश आहे.