Volodymyr Zelensky | ‘नाटो’ सदस्यत्वाच्या बदल्यात डोनबास सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव?

NATO Membership |
NATO Membership | ‘नाटो’ सदस्यत्वाच्या बदल्यात डोनबास सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव?File Photo
Published on: 
Updated on: 

कीव; वृत्तसंस्था : अबुधाबी येथे पार पडलेल्या शांतता चर्चेच्या ताज्या फेरीनंतर अमेरिकन मध्यस्थांनी युक्रेनसमोर नवा प्रस्ताव मांडल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी दिली. या प्रस्तावानुसार, युक्रेनने आपल्या पूर्व भागातील ‘डोनबास’ प्रांतातून माघार घेतल्यास, त्या बदल्यात युक्रेनला 'नाटो' संघटनेचे सदस्यत्व देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे अमेरिकन वाटाघाटीकारांनी सुचवले आहे. झेलेन्स्की यांच्या कार्यालयाच्‍या निवेदनानंतर रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

शांतता चर्चेदरम्यान प्रादेशिक तडजोडीचा संबंध थेट नाटो सदस्यत्वाशी जोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले. अमेरिकन प्रतिनिधींनी विचारले की, युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्‍यास युक्रेन डोनबासमधून माघार घेईल का? यावरून नाटोचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे झेलेन्स्की म्हणाले. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या नाटो प्रवेशाला विरोध केल्याने ही चर्चा कठीण असल्याचेही ते म्‍हणाले. युक्रेन जमीन सोडण्यास तयार नसल्याचेही झेलेन्स्की यांनी स्‍पष्‍ट केले.

रशियाचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला

युरोपीय नेत्यांच्या डब्लिन येथील परिषदेतील भूमिकेशी सहमती दर्शवत झेलेन्स्की यांनी रशियाची मागणी फेटाळून लावली. संपूर्ण युरोपच्या सुरक्षा रचनेवर आधी करार करण्याऐवजी हे युद्ध थांबवणे हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, पूर्व डोनेस्तक प्रांतातील कोस्त्यंतिनिव्हका शहरासाठी पुतिन यांनी सुचवलेला स्थानिक मानवतावादी युद्धविरामही झेलेन्स्की यांनी नाकारला. रशियाला हे शहर बळाचा वापर करून जिंकता येत नसल्याने हा प्रस्ताव मांडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, रशियाने युद्धात नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

एक हजारांहून अधिक कैद्यांची अदलाबदल आणि युरोपचा सहभाग

अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन दिवस चाललेल्या या चर्चेत मोठा तोडगा निघाला नसला, तरी दोन्ही देशांनी १,००० हून अधिक युद्धकैद्यांची अदलाबदल करण्यावर सहमती दर्शवली आहे. याशिवाय, आगामी शांतता चर्चेत युरोपलाही सहभागी करून घेण्यास सर्व पक्षांनी मान्यता दिल्याचे अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी झेलेन्स्की यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.