

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत (US presidential election) इतिहास रचला आहे. त्यांनी सर्व सात स्विंग स्टेट्समध्ये विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना क्लीन स्वीप केले. त्यांनी ॲरिझोना स्टेटसमध्ये विजय मिळवून विजय मिळवला आहे. येथे त्यांना ११ इलेक्टोरल मते मिळाली. यामुळे ट्रम्प यांच्या एकूण इलेक्टोरल मतांची संख्या ३१२ झाली आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना २२६ मते मिळाली आहेत.
स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प यांचे वर्चस्व राहिले. त्यात पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. ही स्विंग स्टेट्स ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी निर्णायक ठरली आहेत. विशेषतः ॲरिझोना (Arizona) स्टेटचा अलीकडील काही वर्षात डेमोक्रेटिक पक्षाकडे कल राहिला होता. हे स्टेट ट्रम्प यांनी जिंकले आहे.
२०२० मध्ये मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ॲरिझोना स्टेटमध्ये विजय मिळवला होता. ते १९९६ मधील बिल क्लिंटन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारे ते पहिले डेमोक्रॅट बनले होते. ट्रम्प यांचा या वर्षीचा विजय महत्त्वपूर्ण बदल दर्शवितो. कारण ॲरिझोनाचा कल पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडे वळला आहे.
ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान सीमा सुरक्षा, इमिग्रेशन आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या गुन्हेगारी कारवाया या मुद्यांवर भर दिला. २०२३ मध्ये ॲरिझोनात स्थलांतरितांचा ओघ वाढल्याने ट्रम्प यांनी उपस्थित केलेले मुद्दे मतदारांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
ॲरिझोना स्टेटमध्ये २०२० मध्ये बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाला धक्का देत ट्रम्प यांनी जिंकलेले ॲरिझोना हे सहावे स्टेट आहे. बायडेन यांचे ज्या स्टेट्समध्ये वर्चस्व होते. ती स्टेट्स आता ट्रम्प यांनी जिंकली आहेत. त्यात जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिनादेखील जिंकले.