Iran bridge destroyed | इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त

Iran bridge destroyed
तेहरान : इराणमधील सर्वात उंच आणि मोठ्या पुलावर अमेरिकेने दोनदा हवाई हल्ले केले. त्यातील दुसर्‍या हल्ल्याचे हे छायाचित्र.
Published on
Updated on

तेहरान, वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त केल्याचा दावा करत युद्धातील तणाव आणखी वाढवला आहे. तेहरान आणि कराज यांना जोडणारा 136 मीटर उंचीचा ‘1 सस्पेन्शन ब्रिज’ हल्ल्यात कोसळल्याचा व्हिडीओ समोर आले आहेत.

इराणच्या सरकारी माध्यमांनुसार या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून, 95 जण जखमी झाले आहेत. पुलाच्या मध्यभागी दोन वेळा हल्ला झाल्याने मोठी दरी निर्माण झाली आहे. हा पूल देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपैकी एक मानला जात होता.

युद्ध अधिक तीव्र करण्याचा इशारा

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘यापेक्षा अधिक मोठे हल्ले होतील’ असा इशारा दिला. यापूर्वी त्यांनी इराणने करार न केल्यास देशाला ‘पाषाणयुगात परत नेऊ’ अशी धमकी दिली होती. तसेच, वीज निर्मिती प्रकल्पांवरही हल्ले करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

इस्फाहानमधील हल्ल्याची पुष्टी

इराणमधील इस्फाहान क्षेपणास्त्र तळावर झालेल्या मोठ्या हल्ल्याचीही पुष्टी झाली आहे. या भागात उच्च समृद्ध युरेनियम साठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणमधील दीड लाख इमारतींचे नुकसान

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले होत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांवर आणि पायाभूत सुविधांवर दिसून येत आहे. इराणी रेड क्रेसेंटने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास दीड लाख निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यांमुळे केवळ घरेच नव्हे, तर अत्यावश्यक सेवांनाही मोठा फटका बसला आहे. रेड क्रेसेंटच्या माहितीनुसार, किमान 316 आरोग्य, वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा केंद्रांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 763 शाळा आणि 18 रेड क्रेसेंट केंद्रेही हल्ल्यांमध्ये बाधित झाली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

शोध आणि बचाव मोहिमेत श्वान पथकांची मदत

हल्ल्यानंतर बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. रेड क्रेसेंटने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून 693 शोध आणि बचाव मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. या मोहिमांमध्ये श्वान पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्या जखमी आणि मृतदेह शोधून काढले आहेत.

दाव्यांची स्वतंत्र पडताळणी अद्याप नाही

ही आकडेवारी इराणी रेड क्रेसेंटने दिली असली, तरी स्वतंत्रपणे याची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे नुकसानाचे खरे प्रमाण याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गल्फ देशांवरही परिणाम

दरम्यान, इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे गल्फमधील विमानतळ, ऊर्जा प्रकल्प आणि निवासी भागांनाही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा संघर्ष आता प्रादेशिक पातळीवर अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news