

इराणने अमेरिकेवर किंवा त्यांच्या हितसंबंधांवर कोणत्याही स्वरूपात हल्ला केला तर अमेरिकन सशस्त्र दलांची संपूर्ण ताकदीने तुमच्यावर हल्ला केला. असा हल्ला तुम्ही इतिहासात कधीही पाहिला नसेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, इस्रायलने तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. तसेच इराणच्या बुशेहर प्रांतातील साउथ पार्स गॅस क्षेत्राशी जोडलेल्या नैसर्गिक वायू प्रक्रिया केंद्रावर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, इराणवरील हल्ल्यात अमेरिकेचा काहीही संबंध नव्हता. आता इराणने आपल्यावर कोणत्याही प्रकारे किंवा स्वरूपात हल्ला केला तर अमेरिकेच्या सशस्त्र दलांची संपूर्ण ताकद आणि पराक्रमाने यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीवर तुमच्यावर येईल. आपण इराण आणि इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतो आणि हा रक्तरंजित संघर्ष संपवू शकतो. दरम्यान, १३ जून रोजी ट्रम्प यांनी इराणला अणु करारासाठी चर्चेचे निमंत्रण दिले होते. इराणने करार केला नाही, तर त्याचे परिणाम अधिक वाईट होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
शुक्रवार १३ जून रोजी इस्त्रायलने इराणविरोधात 'ऑपरेशन रायझिंग लायन' मोहिम राबवली. इस्रायली हवाई दलाने इराणमधील तेहरान, इस्फहान आणि तब्रिझभोवती तेल आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणचा अणुकार्यक्रम इस्त्रायलसाठी धोका असल्याचेही स्पष्ट केले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस' अंतर्गत इस्रायलवर १५० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत.दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अणु कार्यक्रमासंदर्भात अमेरिकेची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच इराण आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवेल, असा निर्धारही व्यक्त केला आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव कमालीच्या शिगेला पोहचला आहे.
यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (दि. १४ जून)पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि युक्रेन शांतता चर्चेवर चर्चा करण्यासाठी ५० मिनिटांची फोनवरून चर्चा केली. पुतिन यांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी शनिवारी ही माहिती दिली. पुतिन यांनी ट्रम्प यांना इराण आणि इस्रायलच्या नेत्यांसोबतच्या त्यांच्या अलिकडच्या चर्चेची माहिती दिली. इराणी अणुप्रश्नी परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याच्या रशियाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांपैकी कोणीही इराणी अणुकार्यक्रमावर चर्चेची शक्यता नाकारली नाही, असेही उशाकोव्ह म्हणाले.