

Israel-Gaza war
इस्रायल-गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धविरामासाठी (शस्त्रसंधी) आवश्यक अटींवर सहमत झाले आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या माहितीमुळे आता गाझामधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्षाला पूर्णविराम मिळण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.दरम्यान, यापूर्वी, इराण आणि इस्रायल यांच्यात १२ दिवस चाललेले युद्ध थांबवण्यातही आपण महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'माझ्या प्रतिनिधींनी इस्रायलच्या अधिकाऱ्यांसोबत गाझा मुद्द्यावर दीर्घ आणि अर्थपूर्ण चर्चा केली. इस्रायल ६० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी आवश्यक अटींवर सहमत झाले आहे. या काळात आम्ही सर्व पक्षांसोबत मिळून युद्ध संपवण्याच्या दिशेने काम करू. हा प्रस्ताव अंतिम रूप देण्यात कतार आणि इजिप्तची महत्त्वाची भूमिका आहे.
'मला आशा आहे की, मध्य-पूर्वेच्या भल्यासाठी हमास हा करार स्वीकारेल, कारण परिस्थिती यापेक्षा चांगली होणार नाही. जर हमासने हा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.' पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पुढील आठवड्यातील अमेरिका दौऱ्यादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यात अधिकृत करार होईल, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केली.
हमासने गाझामधील उर्वरित ओलिसांना सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत; परंतु शस्त्रसंधीस स्पष्ट नकार दिला आहे. हमासच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणानंतरच युद्धविरामाचा मार्ग निघेल, असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.
गाझामधील युद्धाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली, जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून १,२०० लोकांची हत्या केली आणि २५१ जणांना ओलीस ठेवले होते. प्रत्युत्तरात, इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत ५६,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत आणि या प्रदेशात गंभीर मानवतावादी संकट निर्माण झाले आहे.