

वॉशिंग्टन डीसी; वृत्तसंस्था : पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानातील सरकारमध्ये तिथे हुकूमशाही वाढत चालल्याचा इशारा अमेरिकेतील 42 खासदारांनी दिला आहे. पाकमध्ये पारंपरिक अत्याचार आणि मानवी हक्कांवरील संकट वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकार्यांना अमेरिकेत तत्काळ बंदी घाला, अशी मागणी या खासदारांनी केली आहे. तसे पत्र या खासदारांनी परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना दिले आहे.
या खासदारांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमिला जयापल आणि ग्रेग कासर यांचाही समावेश आहे. पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील अधिकार्यांच्या अत्याचारांविरोधात बोलणार्या अमेरिकन नागरिकांना धमक्या, दबाव आणि त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. मनमानी पद्धतीने अटक, दबाव आणणे आणि हल्ले यांचा समावेश आहे.
पत्रात काही ठोस उदाहरणेही दिली आहेत. व्हर्जिनियामधील पत्रकार अहमद नूरानी यांच्या रिपोर्टनंतर त्यांच्या बंधूंचे अपहरण करून त्यांना एक महिना ओलिस ठेवले गेले होते. तर पाकिस्तानी-अमेरिकन संगीतकार सलमान अहमद यांच्या जावयाचेही अपहरण केले गेले होते. अमेरिकन अधिकार्यांनी हस्तक्षेप करेपर्यंत त्यांना ओलीस ठेवले गेले होते.
मानवी हक्कांचा भंग : पाकिस्तानमधील लष्कर समर्थित सरकारखाली मानवी हक्कांचे उल्लंघन वाढले आहे. विरोधक नेते अटक, पत्रकार धमकावले किंवा देश सोडण्यास भाग पाडले जात आहेत. सामान्य नागरिक सोशल मीडियावरील पोस्टमुळे अटक होत आहेत. बलुचिस्तानमधील महिलांवर, धार्मिक अल्पसंख्याकांवर आणि जातीय समुदायांवर अन्यायकारक दबाव आहे.
अमेरिकन नागरिकांविरुद्ध दडपशाही : अमेरिकन नागरिक किंवा रहिवासी जे पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेविरुद्ध बोलतात, त्यांच्यावर धमक्या, दबाव आणि हल्ले केले जात आहेत. या कारवाया त्यांच्या पाकिस्तानमधील कुटुंबीयांवरही परिणाम करत आहेत.
निवडणुकीतील अनियमितता : पाकमधील 2024 च्या निवडणुकांमध्ये अनियमितता आढळली असल्याचे स्वतंत्र अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदवले आहेत. नागरिकांना लष्करी न्यायालयांत खटले दाखल करण्याची धमकी दिली जात असून, न्याय-व्यवस्थेवरही दबाव टाकला जात आहे.
खासदारांच्या मागण्या
आरोपी अधिकार्यांवर व्हिसा बंदी आणि मालमत्ता गोठवणे यांसारखे उपाय करावेत
माजी पंतप्रधान इम्रान खान आणि इतर राजकीय कैद्यांना मुक्त करावे
मानवी हक्कांचे रक्षण आणि अमेरिकन नागरिकांना आंतरराष्ट्रीय दबावापासून सुरक्षित ठेवावे