

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : आखाती देशांतील महिनाभराची शांतता मोडीत काढत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मंगळवारी रात्री अमेरिकन सैन्याने इराणमधील अनेक संवेदनशील लष्करी तळांवर हवाई हल्ले चढवले. या कारवाईला तत्काळ प्रत्युत्तर देत तेहरानने संपूर्ण पश्चिम आशियातील जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कुवेत, बहरीन आणि इराकमधील स्वायत्त कुर्दिस्तान भागात असलेल्या अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा केला. या हल्ल्यांत १ अमेरिकन जवान, तर ११ इराणी नागरिक मरण पावले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने मंगळवारी संध्याकाळी निवेदन जारी करत सांगितले की, इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, रडार प्रणाली आणि सागरी मालमत्तांवर क्षेपणास्त्रांचा मारा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने व्यापारी जहाजांवर आणि आखातातील अमेरिकन सैन्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कठोर पावले उचलण्यात आली. इराणने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर याहूनही अधिक तीव्र कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
लग्न समारंभावर क्षेपणास्त्र कोसळले
इराणी सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, या ताज्या हल्ल्यांमध्ये देशभरात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. खुझेस्तान प्रांतात तीन ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत सहाजणांचा मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले. ६८ हून अधिक लोक जखमी झाले. याव्यतिरिक्त बंदर अब्बास, केशम बेट आणि सीरिक येथील सागरी केंद्रांवरही हल्ले नोंदवले गेले. अमेरिकन लष्कराने मात्र नागरिक किंवा नागरी वस्त्यांना कधीही लक्ष्य करत नसल्याचा दावा करत हे आरोप फेटाळले.
इराणचा प्रतिहल्ला
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने जॉर्डनमधील अकाबाच्या आखाती किनाऱ्यावरील अमेरिकन तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनच्या सैन्याने यातील १० क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला, तर उर्वरित क्षेपणास्त्रे निर्मनुष्य भागात पडली.