

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : मध्य पूर्वेतील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य शांतता करार होण्याच्या चर्चा सुरू असतानाच रविवारी इस्रायलने लेबनाॅनची राजधानी बैरूतच्या उपनगरांवर हवाई हल्ले केले. त्यामुळे प्रस्तावित कराराबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे.
इस्रायली लष्कराने बैरूतमधील दाहिया परिसरावर हल्ला केला. हा भाग इराणसमर्थित सशस्त्र प्रॉक्सी संघटना हिजबुल्लाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी इस्रायलने हिजबुल्लावर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत उत्तर इस्रायलच्या दिशेने गोळीबार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर दक्षिण लेबनाॅनमधील जवळपास ३० गावे आणि शहरांतील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मध्य पूर्वेतील संघर्षानंतर अमेरिका व इराण यांच्यात युद्धविराम करार होण्याची शक्यता निर्माण झाली असताना हा हल्ला झाला आहे. या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. इराणचे अमेरिकेशी चर्चेचे प्रमुख प्रतिनिधी मोहम्मद बाघेर घालिबाफ यांनी लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला. तुम्हाला तुमच्या वचनांची अंमलबजावणी करण्याची इच्छाच किंवा क्षमता नसेल तर चर्चेचा पुढील मार्ग शक्य नाही, असे त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, करार होताच जगातील महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी खुली होईल, असेही म्हटले होते. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी रविवारी करारावर स्वाक्षरी होणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही येत्या काही दिवसांत करार होण्याची शक्यता नाकारली नाही, असे इराणी सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणमध्ये कराराला प्रचंड विरोध असून, विविध शहरांमध्ये आंदोलनांचा भडका उडाला आहे. मशहद आणि तेहरानमधील निदर्शनांमुळे अंतर्गत राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
लेबनॉन मुख्य अडथळा
या चर्चांमध्ये लेबनॉन हा एक महत्त्वाचा अडथळा बनला आहे. व्यापक शांतता करारांतर्गत लेबनाॅनमधील लढाई थांबवावी आणि इस्रायली सैन्याने लेबनाॅनी भूभागातून माघार घ्यावी, अशी इराणची मागणी आहे. मात्र अमेरिका-इराण चर्चेत थेट सहभागी नसलेल्या इस्रायलने हिजबुल्लावर इस्रायलवर हल्ला केल्यास लेबनॉनमध्ये लष्करी कारवाया सुरूच राहतील, स्पष्ट केले आहे.
संभाव्य करारात काय असू शकते?
इराण होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करेल.
अमेरिका इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवेल.
एप्रिलमध्ये झालेला युद्धविराम आणखी ६० दिवसांसाठी वाढवला जाईल.
या कालावधीत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत व इराणवरील
अमेरिकी निर्बंध हटविण्याबाबत सविस्तर चर्चा होईल.
पुन्हा हल्ले नकोत : ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी बैरुतच्या दक्षिण उपनगरांवर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. अमेरिका आणि इराण एका ऐतिहासिक शांतता कराराच्या अगदी जवळ आले असताना हे हल्ले झाले. यापुढे लेबनॉनवर हल्ले करू नका, असे ट्रम्प यांनी सुनावले आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर किंवा हिजबुल्लाहसह इतर कुणाकडूनही कोणतेही हल्ले केले जाऊ नयेत, असे त्यांनी 'ट्रुथ सोशल' पोस्टमध्ये म्हटले आहे. बैरुतवर आज सकाळी झालेला हल्ला व्हायला नको होता, विशेषतः अशा खास दिवशी जेव्हा आम्ही इराणसोबतच्या शांतता कराराच्या जवळ पोहोचलो आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, येत्या २ ते ३ तासांत इराणसोबत शांतता करार होईल, असे ट्रम्प यांनी रविवारी रात्री उशिरा फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ११. ४५ वाजता बीबीसीने हे वृत्त दिले.