US India tariff reduction | अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले; ५० टक्क्यांवरून आता केवळ १८ टक्के

व्यापार कोंडी फुटली; पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणाः सहकार्याबद्दल मोदी यांचे मानले आभार
US India tariff reduction
US India tariff reduction | अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले; ५० टक्क्यांवरून आता केवळ १८ टक्के
Published on
Updated on

वॉशिंग्टन/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताने युरोपियन युनियनबरोबर नुकत्याच केलेल्या महत्त्वाकांक्षी कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार अंतिम झाल्याची घोषणा केली. त्याचवेळी ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के करण्यात येत असल्याचे सांगितले.

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराअंतर्गत दोन्ही देश प्रतिपूर्ती शुल्कात कपात करणार आहेत. भारत अमेरिकेविरोधातील प्रतिपूर्ती शुल्क आणि गैरशुल्क अडथळे (नॉन टॅरिफ बॅरिअर्स) शून्यावर आणण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकेल. अमेरिकेने भारतावरील शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले. ट्रम्प यांनी शुल्क कपातीची घोषणा करण्यापूर्वी, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी, दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनी संभाषण झाल्याचे सांगितले. तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी नुकताच संवाद साधला. पुढील घडामोडींसाठी स्टे ट्यून, असे गोर यांनी या घडामोडीआधी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौर्‍याला सुरुवात केलेल्या दिवशीच शुल्क कपातीची घोषणा झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांदरम्यान तणाव कमी करण्यासाठी आणि प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जयशंकर यांचा अमेरिकेचा दौराही प्रामुख्याने याच पार्श्वभूमीवर नियोजित असल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, जयशंकर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आयोजित महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीवरील मंत्रिस्तरीय बैठकीसाठी अमेरिकेला भेट देत आहेत.

दरम्यान, भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर 25 टक्के अतिरिक्त शुल्कासह भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क एकूण 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर भारत-अमेरिका संबंध ताणले होते. भारतावर ट्रम्प यांनी लादलेल्या कठोर शुल्कानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात संभाव्य व्यापार कराराबाबत चर्चांना उधाण आलेले असताना झालेली ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छानंतर घडामोडींना वेग

ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला होता. त्यानंतर खरे तर यासंदर्भातील घडामोडींना वेग आला होता. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही म्हणून दोन्ही देशांमध्ये एक ऐतिहासिक नातेसंबंध आहेत, असे ट्रम्प यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले होते.

घटनाक्रम

2025

2 एप्रिल : अमेरिकेने आपल्या जागतिक ‘लिबरेशन डे’ शुल्क कारवाईअंतर्गत अनेक भारतीय आयातींवर 26 टक्के प्रतिपूर्ती शुल्क (टॅरिफ) लागू केले.

10 एप्रिल : ट्रम्प यांनी हे शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले आणि सर्व अमेरिकी आयातींवर 10 टक्के शुल्क कायम ठेवले.

31 जुलै : ट्रम्प यांनी सर्व भारतीय वस्तूंवर 25 टक्के शुल्क जाहीर केले आणि भारताने रशियन तेल खरेदी सुरूच ठेवल्यास दंड आकारला जाईल, असा इशाराही दिला.

7 ऑगस्ट : भारताने रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवली असल्याचा हवाला देत, ट्रम्प यांनी अमेरिकेकडे पाठवण्यात येणार्‍या भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवले. अमेरिकी व्यापार भागीदारांमध्ये भारतीय वस्तूंवरील हे सर्वाधिक शुल्क होते.

2026

2 फेब्रुवारी : ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के करण्यात आल्याची घोषणा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news