वाशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेने भारताला एमएच ६० रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिका भारताला २४ हेलिकॉप्टर्स पुरविणार असून त्याचा एकूण खर्च २.४ अब्ज डॉलर एवढा आहे.
एमएच ६० रोमियो सीहॉक ही जगातील अत्याधुनिक अशी हेलिकॉप्टर समजली जातात. युद्धावेळी पानबुड्यावर अचूक निशाणा साधू शकणाऱ्या या हेलिकॉप्टर्सची भारताला गेल्या एक दशकापासून गरज भासत आहे. ही हेलिकॉप्टर्स जमिनीवरून तसेच जहाजातून, एअरक्रॉफ्ट कॅरियर्स, क्रूझर्स यावरून ऑपरेट करता येतात. तसेच समुद्रातील शोध आणि बचावकार्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग होणार आहे. सध्या ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या नौदलात तैनात आहेत. ही हेलिकॉप्टर्स भारताला मिळाल्यानंतर प्रशांत महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे.
एमएच ६० रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर भारताला विकण्याबाबतची अधिसूचना ट्रम्प प्रशासनाने जारी केली आहे. यामुळे ही हेलिकॉप्टर भारताच्या संरक्षण दलात लवकरच दाखल होणार आहेत. भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने आम्ही भारताला हेलिकॉप्टर्स पुरविणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.
सध्या भारतीय समुद्रात चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे भारताला एमएच ६० रोमियो सीहॉक या जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सची गरज असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.