

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रान्सजेंडर लोकांना सैन्यात भरती होण्याची परवानगी देणार नाही, असे अमेरिकेच्या सैन्य दलाने स्पष्ट केले आहे. तसेच हा निर्णय त्वरित लागू केला जात असल्याचेही सैन्यदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
सैन्यदलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकन सैन्य यापुढे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणार नाही. तात्काळ प्रभावीपणे, लिंग संक्रमणाची पुष्टी संदर्भातील सर्व वैद्यकीय प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत.
२७ जानेवारी २०२५ रोजी ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अमेरिकेच्या लष्कराला आकार देणाऱ्या अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये ट्रान्सजेंडर सेवेतील सदस्यांना अमेरिकन सैन्यात सेवा देण्यास बंदी घालण्याचा समावेश आहे.
'सीएनएन'च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये ट्रान्सजेंडर अमेरिकन लोकांना सशस्त्र दलात सेवा देण्यास बंदी घातली होती. यानंतर २०२१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा बंदी आदेश रद्द केला हाेता. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या २०२१ च्या ट्रान्सजेंडर सदस्यांना सेवा देण्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली हाेती.