

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी सी : पाकिस्तानमध्ये होणार्या शांतता चर्चेसाठी अखेर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी आपली सहमती दर्शविली आहे. ही बोलणी होतात की नाही, याविषयी उलटसुलट संकेत दिले जात होते. मात्र सोमवारी ही संदिग्धता दूर झाली.
या चर्चेसाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स मंगळवारी वॉशिंग्टनहून इस्लामाबादकडे रवाना होण्याची अपेक्षा आहे. दोन इराणी अधिकार्यांनीही त्यांच्या देशाच्या सहभागाबाबत होकार दिला. चर्चेत व्हान्स सहभागी झाल्यास मागील चर्चेच्या फेरीत सहभागी झालेले प्रभावशाली राजकीय आणि लष्करी नेते मोहम्मद बाघेर घालिबाफ हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना धमक्या दिल्यानंतर चर्चेची शक्यता अधिकाधिक धूसर होत गेली होती. त्यातच युद्धविराम मुदत संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने तणाव वाढला होता. पण आता युद्धविराम संपण्याच्या काही तास आधीच करार होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने युद्धविराम सात एप्रिल रोजी जाहीर केला. तो नेमका किती वाजता संपेल हे जाहीर केले नाही. मात्र, पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले की, बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही वेळ संपेल. अमेरिकेने होर्मुझजवळ एका इराणी मालवाहू जहाजाचा ताबा घेतल्याबद्दल इराणने प्रत्युत्तराच्या धमक्या अधिक तीव्र केल्या आणि त्याला ‘समुद्री दरोडा’ असे म्हटले. हे परस्परविरोधी संकेत पहिल्या चर्चेपूर्वी इराणने दिलेल्या संकेतांसारखेच होते. त्या पहिल्या फेरीचा शेवट युद्ध समाप्त करण्याच्या कराराविना झाला होता. इराणने त्या चर्चा होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली होती. पण काही तासांनी त्यांचे शिष्टमंडळ तेथे पोहोचले होते.
कच्चे तेल पुन्हा महागले
होर्मुझ सामुद्रधुनीत दोन्ही देशांच्या नाकेबंदीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि गॅस वाहतूक या मार्गाने होते. या तणावामुळे तेलाच्या किमतीत सहा टक्केपेक्षा अधिक वाढ झाली असून, शेअर बाजारातही अस्थिरता दिसून आली आहे; तर युरोपीय शेअर बाजार घसरले.