US Air Traffic Disrupted : एका राऊटरमुळे अमेरिकेची हवाई वाहतूक ५ तास ठप्प : २० हजारहून अधिक विमानांना फटका

US Air Traffic Disrupted washington dc airport
Published on: 
Updated on: 

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन : अमेरिकेतील हवाई वाहतूक यंत्रणा शुक्रवारी तब्बल पाच तास पूर्णपणे ठप्प झाल्याने २० हजारहून अधिक विमानांच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झाला. सरकारी कंत्राटदार कंपनी 'एल३हॅरिस'ने बसवलेल्या एका नवीन राऊटरमधील बिघाडामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती उद्‌भवल्याची शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी शनिवारी वर्तवली आहे.

परिवहन मंत्री शॉन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार 'एल३हॅरिस' कंपनीकडून जुन्या कॉपर वायरऐवजी फायबर ऑप्टिक लाईन जोडण्याचे काम सुरू होते. यावेळी अर्कान्सास आणि टेक्सास येथे बसवलेल्या नवीन राऊटरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला.

या राऊटरवरून दर चार ते पाच सेकंदाला एक हजारहून अधिक कनेक्शन रिक्वेस्ट पाठवल्या गेल्याने देशभरातील २२ पैकी १७ हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांवर ताण आला. परिणामी विमान व रडारमधील संवादात अडथळे निर्माण झाले. 'फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन'ला देशभरातील उड्डाणे तात्पुरती थांबवावी लागली. ही मानवी चूक होती की सदोष उपकरणामुळे हा प्रकार घडला, याचा तपास सुरू असल्याचे डफी म्हणाले.

जुनाट यंत्रणेचा फटका

अमेरिकेची हवाई नियंत्रण प्रणाली अत्यंत जुनाट झाल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. २५ वर्षे जुने राऊटर २००६ मध्येच बदलणे अपेक्षित होते. केवळ जुन्या कॉपर वायर प्रणालीच्या देखभालीसाठी एफएए दरवर्षी १ अब्ज डॉलर्स खर्च करते. धक्कादायक म्हणजे हवामानाच्या माहितीसाठी आजही ४०० हून अधिक केंद्रांवर ‘फ्लॉपी डिस्क’ आणि जुन्या ‘कॉम्पॅक’ संगणकांचा वापर केला जातो. ते २०२८ पर्यंत बदलण्याचे नियोजन आहे.

याअगोदर २०२३ मध्येही गोंधळ

एका कंत्राटदाराकडून यापूर्वी जानेवारी २०२३ मध्येही चुकून फाईल्स डिलिट झाल्याने ११ हजार विमानांना फटका बसला होता. ऐन वीकेंडच्या गर्दीत झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी डफी यांनी ५० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.